पथ्रोट,
larvae-found-in-anganwadi-chikki : कुपोषण निर्मूलनासाठी नवीन आहाराचा समावेश करण्यात येत असून त्यातीलच एक भाग म्हणून सरकारने अंगणवाडीत शेंगदाण्याच्या चिक्कीचा पुरवठा सुरू केला. त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात येत आहे. पथ्रोट येथील वार्ड क्रमांक सहा खोडगाव रस्ता येथील अंगणवाडी केंद्रातून वाटप करण्यात आलेल्या चिक्कीत सोंडे व अळ्या निघाले आहेत. सदरचा प्रकार हा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत असल्याने याला जबाबदार असणारे अधिकारी, ठेकेदार या सर्वावरच कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

मंगळवार ९ जून रोजी निकिता अनिल दांडगे या सदर अंगणवाडी केंद्रावर पोषण आहार घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या विश्व अनिल दांडगे (वय तीन) या मुलासाठी तेथील अंगणवाडी सेविकेने तीन महिन्याचा साठा म्हणून एकत्रित शेंगदाणा चिक्कीचे पाकीट दिले. ते पाकीट घरी आणल्यानंतर मुलाला खाण्यासाठी देताना फोडले असता त्यामधून पांढर्या आळ्या व लाल तोंडे फिरत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून निकिता दांडगे पूर्णतः घाबरल्या. महिला व बालविकास विभागाकडून पुरवण्यात येत असलेले चिक्की खराब निघत असल्यामुळे पालकांनी जर न पाहता मुलाला खायला दिले तर चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकते.
अंगणवाडीमध्ये शून्य ते तीन वर्ष वयोगटातील चिमुकल्यांना विविध प्रकारचा पोषण आहार शासनाकडून पुरवण्यात येत असतो. अशावेळी सुपरवायझर ते अंगणवाडी सेविकेपर्यंत सर्वांनीच त्याची पूर्तता करून खात्री करणे व ते योग्य आहे की नाही याची तपासणी करणे अनिवार्य आहे. पुरवठा ठेकेदार यांनी सुद्धा यावर लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु, या प्रकरणात सदर विभागाकडून पूर्णतः दुर्लक्ष केल्या गेलेले दिसत आहे. प्रशासन व संबंधित विभाग कारवाई बाबत काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात पंचायत समिती अचलपूर येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वैभवकुमार मापते
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेचा पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल, असे सांगितले.
संबंधितांवर कारवाई करावी
अंगणवाडीतून दिलेली शेंगदाणा चिक्की पूर्णतः निकृष्ट असून अळ्यांनी व सोंड्यांनी भरलेली होती. खायला देण्या अगोदर पाहिल्यामुळे हा अनर्थ टळला याला जबाबदार असणार्या अधिकारी व कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी.
-निकिता दांडगे
लाभार्थी माता, पथ्रोट