जिल्ह्यातील १७५ रस्त्यांचे जनता करणार ‘ऑडिट’

गुणवत्तेसाठी जिल्हा परिषदेची नागरिकांना साद

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
amravati-roads : जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ग्रामीण भागातील मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या बांधकामासह देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यात येतात. सध्या जिल्हा परिषदेकडे रस्ते विकास योजनेअंतर्गत ६४३४.१४ कि.मी. लांबीचे ग्रामीण मार्ग तसेच ९९५.४० कि.मी. लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत.
 
 
 
JLK
 
 
 
या रस्त्यांच्या बांधकाम व देखभाल-दुरुस्तीसाठी मुख्यत्वे जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. शासनाच्या नियमानुसार रस्त्यांचे बांधकाम, मजबुतीकरण अथवा नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामासाठी दोन वर्षांचा दोष दायित्व निवारण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने काम पूर्ण झाल्याच्या दिनांकांपासून दोन वर्षाचा कालावधी होईपर्यंत कंत्राटदारा मार्फत दोष निवारणाचे काम करून घेण्यात येते.
 
 
सद्यस्थितीत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बांधकाम, मजबुतीकरण व नूतनीकरण करण्यात आलेल्या १२४ ग्रामीण मार्ग तसेच ५१ इतर जिल्हा मार्ग अशा एकूण १७५ रस्त्यांचा दोष दायित्व निवारण कालावधी अद्याप सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे दोष, खड्डे, तडे अथवा पृष्ठभागाची हानी आढळून आल्यास संबंधित कंत्राटदाराकडून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या माहितीसाठी दोष दायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांची यादी जिल्हा परिषद अमरावतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी यादीतील रस्त्यांवर खड्डे, तडे किंवा अन्य दोष आढळल्यास कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अमरावती यांच्या कार्यालयास तात्काळ कळवावे.
 
 
नागरिकांनी दोष दायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे, तडे अथवा अन्य दोषांची माहिती बांधकाम विभागास दिल्यास संबंधित कंत्राटदारामार्फत समय मर्यादेत आवश्यक कार्यवाही करून दोष निर्मूलन करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 
 
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दोष दायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे दोष आढळल्यास त्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होईल तसेच दोषांचे तातडीने निवारण करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.