लक्ष द्या! पाणीपुरवठा विस्कळित झाला

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
पुणे
Water Supply खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात सोमवारपासून ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पूर्व पुण्यातील नागरिकांच्या अडचणींचा विचार करून महापालिकेने महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला या पाणीकपातीमधून पूर्णपणे वगळले आहे. यासंदर्भात पाणीकपात मागे घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
 


Pune Water Supply Disruption 
गेल्या काही आठवड्यांपासून भामा आसखेड धरणावर अवलंबून असलेल्या पूर्व पुण्यातील अनेक भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यातच मागील आठवड्यात खेड तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामांदरम्यान विद्युतवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे या भागात पाणीकपात लागू न करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या अडचणींची दखल घेत आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत, जोपर्यंत संबंधित भागातील नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होत नाही तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत या भागात पाणीकपात लागू करू नये, असे निर्देश देण्यात आले.या निर्णयाचा लाभ भामा आसखेड धरणाच्या जलपुरवठा क्षेत्रातील वडगावशेरी मतदारसंघातील प्रभाग Water Supply  क्रमांक १ ते ६ मधील बहुतांश नागरिकांना होणार आहे. विमाननगर, नगर रस्ता परिसर, जय पार्क, म्हाडा कॉलनी, एसआरए वसाहती, कुलकर्णी गॅरेज परिसर, यमुनानगर, राजीव गांधी उत्तर व दक्षिण परिसर, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी आणि वडगावशेरी या परिसरांचा त्यामध्ये समावेश आहे.
महापालिकेकडून या भागात दररोज सुमारे १५७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती १३५ लिटर प्रतिदिन या निकषानुसार सुमारे ११ लाख ७० हजार नागरिकांना या जलपुरवठ्याचा लाभ मिळतो. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीकपातीतून या भागाला वगळण्याचा निर्णय घेतल्याने पूर्व पुण्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.