खारपानपट्ट्यातील महिलांचा सेंद्रिय शेतीकडे कल

घरच्या घरी तयार केला दशपर्णी अर्क

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
टाकरखेडा संभू,
organic-farming : पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने भातकुली तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत महिला शेतकरी गटांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातील ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली असून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
 
 
 
 
JK
 
 
 
टाकरखेडा संभू येथील नारीशक्ती हरितक्रांती महिला शेतकरी गटाने कपाशी पिकासाठी तब्बल २०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. गटाच्या निमंत्रक पौर्णिमा सवाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हा उपक्रम राबविला. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी कडुलिंब, सिताफळ, धोत्रा, निरगुडी, रुई, पपई, रायमुनी, गुळवेल, लाल कन्हेर आणि करंज या दहा वनस्पतींचा पाला वापरण्यात आला. यामध्ये दोन किलो हिरवी मिरची, एक किलो लसूण, पाच किलो गूळ आणि पाच लिटर गोमूत्र मिसळून २०० लिटर पाण्यात हे मिश्रण तयार करण्यात आले. हे द्रावण ४० दिवस सावलीत ठेवून दिवसातून दोन वेळा ढवळले जाते. त्यानंतर गाळून फवारणीसाठी वापरले जाते.
 
 
 
दशपर्णी अर्क हे नैसर्गिक कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून प्रभावी मानले जाते. पिकावर कीड येण्यापूर्वी फवारणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच रासायनिक कीटकनाशकांवरील खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळते. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीबाबत जागरूकता वाढत असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोठी मदत होत आहे. मुलांनीही निंबोळ्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल शेती शाळा आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तज्ज्ञांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या उपक्रमात संगीता नाचनकर, जयश्री लाळे, कुसुम मेश्राम, पूजा शेंडे, छाया सवाई, अरुणा लाळे, पुष्पा जामठे, उज्वला पिंगळे, वृंदा मानकर आणि सुशीला मेश्राम यांचा सहभाग होता.
 
 
१० गटांनी तयार केला अर्क
 
 
तालुक्यातील ७९ शेतकरी गटांनी फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आतापर्यंत १० गटांनी दशपर्णी अर्क तयार केला असून पुढील आठवड्यात बहुतांश गट हा उपक्रम राबवतील. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील अवास्तव खर्च कमी करण्यास मदत होईल.
-रूपाली ठाकरे
मेंटर कृषी विभाग
 
 
खर्च कमी करण्याचा उद्देश
 
 
शेतकर्‍यांनी समूहाने एकत्र येऊन शेतीवरील होणारा खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल तसेच येणार्‍या शेतीतील अडचणीला समूहाने सामोरे जाऊन आपल्या शेतामध्ये प्राप्त नियमावीलचे पालन करून पिकाचे उत्पादन वाढविणे हाच एक उद्देश पाणी फाउंडेशन फार्मर कपचा आहे.
-प्रशांत देवळे
पाणी फाउंडेशन टीम