विदर्भातील शाळा ३० जूनला सुरू होणार

प्राथमिक शिक्षक समितीच्या लढ्यात यश

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
अमरावती,
schools-in-vidarbha : विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील आणि शासनाने २० एप्रिल २०२३ शासन निर्णय याची अंबलबचावणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने आज दिले.
 
 
 
AMT
 
 
 
विदर्भातील शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र हे दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिण्याच्या १ तारखेला सुरु होत असते हा इतिहास आहे. परंतु, यावर्षी (२०२६-२७) विदर्भातील शाळा ह्या १५ जूनपासून सुरु होणार असे पत्र धडकले. संपूर्ण उन्हाळाभर विदर्भाचे तापमान ४५ अंश असताना व आता जून महिन्यामध्ये सुद्धा तापमान ४४ अंशाच्या आसपास असल्याने शाळा १५ जूनपासून कशा घ्यायच्या व या तापमानात कसे अध्यपान करावे असा प्रश्न निर्माण झाला. प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यध्यक्ष विजय कोंबे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वात शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेतली. सुरुवातीला राज्य शासनाला निवेदन व पत्र व्यवहार करून निर्णय मागे घेण्याची विनंती शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली. परंतु, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
 
त्यानुसार विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात बुधवार १० जून रोजी न्यायाधीश अनिल किल्लोर व न्यायाधीश राजेश वाकोडे यांच्या समोर सुनावणी झाली. शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी निर्गमित केलेले २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक न्यायालयात सरकारी वकीलांनी सादर केले आणि त्याप्रमाणे आदेश देण्याची विनंती केली. याचिकाकर्त्या प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अ‍ॅड. डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भुमिकेस विरोध केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शासनाच्या भुमिकेवर असहमती दर्शवत विदर्भातील शाळा १५ जून वा २२ जून पासून सुरू करण्याचा संचालकांचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला व २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे ३० जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत आदेश दिले. अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे. यावेळी अमरावती जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष गोकुलदास राऊत, नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रमोद सुरोसे, नागपूरचे पदाधिकारी प्रकाश सव्वालाखे, वर्धा जिल्हा शाखेचे कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंभोरकर, नागपूर तालुका सचिव काजणे उपस्थित होते.