अग्रलेख
narendra modi विकासाच्या वाटेवर धावण्यासाठी सर्वांत आवश्यक असते ते स्थैर्य, धैर्य आणि विचार. वैयक्तिक आयुष्य असो वा सार्वजनिक, स्थिरता कायम जगण्याला बळ देत असते आणि विचारांतून आलेले धैर्य आपल्याला पुढे नेत असते. आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2014 ते 2026 हा काळ जागतिक पातळीवर सर्वांनाच अस्वस्थ करणारा होता. या काळाने कोरोनासारख्या जागतिक महामारीपासून ते विविध देशांमधील बिघडत चाललेले आंतरराष्ट्रीय संबंध, युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अस्थिरता आणि हवामान बदलाच्या संकटांपर्यंत अशा अनेक प्रश्नांनी जगाला अस्वस्थ केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताने विकासाचा मार्ग कधीही सोडला नाही. संकटांचा धैर्याने सामना करत विकासाच्या दिशेने पुढची पावले टाकत आपली वाटचाल कायम ठेवली. या 12 वर्षांच्या काळात केवळ आणि केवळ सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक आव्हानात नव्या संधी शोधल्या गेल्या. पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात आला. डिजिटल परिवर्तन, कल्याणकारी योजना आणि आत्मनिर्भरतेवर भर देत देशाने प्रगतीचा वेग टिकवून ठेवला. केंद्रातील भाजप सरकारला सलग 12 वर्षे, म्हणजेच एक तप पूर्ण झाले असून, हा काळ राष्ट्रीय विचारप्रवाहाला बळकटी देणारा ठरला आहे. या तप:पूर्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.
केंद्रात नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेवर आले ते 2014 मध्ये. त्यांचा पहिला कार्यकाळ अत्यंत आश्वासक ठरला. त्या काळात त्यांनी जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांमुळे विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचारमुक्त आणि कणखर व निर्णायक नेतृत्वाची प्रतिमा निर्माण करत सर्वसामान्य भारतीयांचा राज्यकर्त्यांवरील विश्वास पुन्हा दृढ केला. 2019 ते 2024 हा दुसरा कार्यकाळ तुलनेने आव्हानात्मक होता. या काळात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आले. याच काळात देशाला कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला. आरोग्य व्यवस्था, लसीकरण मोहीम ही आव्हाने सरकारपुढे होती. संकटाच्या काळात आत्मनिर्भर भारत, उत्पादनवाढ, डिजिटल सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देत देशाला नवी उभारी देण्यात मोदींचे सरकार यशस्वी ठरले. त्यामुळेच पुन्हा 2024 ला मोदींना संधी मिळाली. 2024 मध्ये सलग तिसèयांदा सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने ‘विकसित भारत 2047’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून पुढील वाटचाल सुरू केली. 2024 ते 2026 या कालावधीत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संरक्षण, हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर उत्पादन, डिजिटल अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मिती यासारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाची शक्ती बनविण्याच्या उद्देशाने विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यांचे परिणामही दिसत आहेत.
आज संपूर्ण जग अस्थिरतेचा सामना करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि नव्याने उद्भवणारी सुरक्षा संकटे या पृष्ठभूमीवर देशाने गेल्या 12 वर्षांत दाखविलेले राजकीय आणि धोरणात्मक स्थैर्य महत्त्वाचे आहे. स्थिर सरकार देशासाठी किती हितकारक असते, याचे उदाहरण देशाने जगासमोर ठेवले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देतानाच आर्थिक स्वावलंबन, सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक एकात्मता आणि जागतिक स्तरावरील भारताच्या प्रतिष्ठेला बळकटी देण्याचे काम या काळात झाले. विशेष म्हणजे, देशाने आधुनिकतेकडे वाटचाल करताना सांस्कृतिक मुळांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या हजारो वर्षांच्या वारशाचा अभिमान बाळगत तंत्रज्ञान आणि विकासाची कास धरण्याची भूमिका सातत्याने घेतली. त्यामुळे बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये स्वतःचे हित ठामपणे जपणारा, आत्मविश्वासाने निर्णय घेणारा आणि जागतिक पटलावर प्रभाव निर्माण करणारा देश म्हणून भारताची ओळख अधिक स्पष्ट झाली. त्यामुळेच आजचा भारत केवळ जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणूनच नव्हे, तर संकटांना संधींमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असलेला आणि आत्मविश्वासाने उभा असलेला देश म्हणून जगासमोर उभा आहे.
या बारा वर्षांच्या प्रवासात सारे काही चांगलेच झाले, असा दावा करण्याचे कारण नाही. विकास व परिवर्तनाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी यश मिळाले, तर काही ठिकाणी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. काही निर्णयांवर टीका झाली, काही क्षेत्रांमध्ये सरकारकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. रोजगार, शेती, महागाई आणि प्रशासनातील काही बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज लक्षात आली. मात्र या सर्वांत एक गोष्ट सातत्याने अधोरेखित झाली, ती म्हणजे सरकारचा प्रांजळ हेतू. हेतू चांगला असेल तर बदल घडतोच. तो घडेलच. सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करण्याची भावना महत्त्वाची आहे. देशहिताला प्राधान्य देत निर्णय घेण्याची भूमिका आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीमुळेच जनतेचा विश्वास सत्ताधाèयांवर कायम राहिला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रांत अपेक्षित यश मिळाले नाही किंवा जिथे सुधारणा आवश्यक आहेत, त्या बाबींवरही येत्या काळात अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदींसारखे ध्येयवादी, मेहनती आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडणारे नेतृत्व देशाला लाभणे ही अनेक अर्थाने महत्त्वाची बाब आहे. गेल्या बारा वर्षांत भारताने मोठ्या आत्मविश्वासासह मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाकडे अधिक ठामपणे वाटचाल सुरू केली. या प्रवासाचा अंतिम निकाल भविष्यात ठरेल; मात्र भारताला नव्या आत्मविश्वासाची जाणीव करून देण्यात या कालखंडाची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे, हे विसरता येत नाही.
सत्ताधाèयांच्या 12 वर्षांतील कामांचे खरे मूल्यमापन म्हणजे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास. गेल्या बारा वर्षांत भारतात घडलेला सर्वांत मोठा बदल कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ‘राष्ट्रीय अस्मिता आणि आत्मविश्वासाची पुन:प्राप्ती’ असेच द्यावे लागेल. आज आपला देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो, परंतु त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे जग भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर भागीदार म्हणून पाहू लागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे मत ऐकले जाते, त्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि जागतिक प्रश्नांवर भारताकडून नेतृत्वाची अपेक्षा केली जाते. हा बदल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 12 वर्षे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.
आज एका बाजूला वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नव्या आर्थिक संधी आणि जागतिक नेतृत्वाची क्षमता आहे; तर दुसèया बाजूला सामाजिक समरसता, पर्यावरणीय संतुलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील वाटचालीत केवळ आर्थिक प्रगती पुरेशी ठरणार नाही, तर विकासाला मानवी मूल्यांची आणि राष्ट्रीय बांधिलकीची जोड द्यावी लागेल. खèया अर्थाने विकसित भारताची निर्मिती तेव्हाच होईल, जेव्हा प्रगतीचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आणि राष्ट्रहित हीच सर्व निर्णयांची प्रेरणा असेल. अंत्योदय हेच साèयांचे ध्येय असले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ही 12 वर्षे म्हणजे देशाच्या आत्मभानाचा आणि सामर्थ्याचा नवा सुवर्णकाळ आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राला केंद्रस्थानी ठेवून, देशाने एका तपात अगतिकता झटकून जागतिक नेतृत्वाची भूमिका स्वीकारलेली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रीय एकात्मता भक्कम करतानाच, पायाभूत सुविधांचा झालेला कायापालट आणि थेट तळागाळापर्यंत पोहोचलेले डिजिटल व सामाजिक क्रांतीचे लाभ हे या सरकारचे सर्वांत मोठे यश आहे. प्रतिकूल परिस्थितीलाही प्रगतीची संधी बनवणाèया या ‘तपस्येने’ प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘आम्ही जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास पेरला आहे. तोच आत्मविश्वास आपल्याला पुढे नेणार आहे.