अनिल कांबळे,
नागपूर,
smugglers-arrested-with-md : अंमली पदार्थाच्या विक्री आणि तस्करीचे केंद्र बनत चाललेल्या उपराजधानीत आणखी दोघांना मुंबईतून ११३ ग्रॅम मेफोड्रेन (एमडी) नागपुरात आणत असताना गुन्हे शाखेने बसमधून अटक केली. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने समृद्धी महामार्गावरील कर नाक्यावर तपासणी करताना केली.
शकील अहमद अब्दुल खालिद (३५, रा. तकीया दिवाणशाह, मोमीनपुरा) आणि सय्यद शहबाज कुरेशी (२०, रा. कसाबपुरा, मस्जिदजवळ) अशी या दोन तस्करांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे सकाळी सुमारे सव्वा दहाच्या सुमारास हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून नागपुरात येणार असल्याची पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांना माहिती मिळाली. त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नाक्यावर सापळा रचला. मुंबईहून नागपुराकडे येणारी प्रत्येक खासगी बस थांबवून पोलिसांनी पाहणी केली.
यात झडती दरम्यान या दोन तस्करांकडे ११३ ग्रॅम एमडी पावडर जप्त सापडली. त्याची बाजारातील अंदाजे किंमत ११ लाख ३२ हजार रुपये आहे. याशिवाय दोघांकडून रोख साडेचार हजार आणि दोन मोबाईलदेखील पोलिसांनी जप्त केला. चौकशीत या दोघांनी हा अंमली पदार्थ मुंबईतील कुर्ला परिसरातील ‘डिश’ नावाच्या पुरवठादाराकडून आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पीआय दर्शन पाटील, एपीआय शिवाजी ननवरे, शेषराव राऊत, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, कुणाल बोडखे, किशोर यांनी केली.