पहिल्यांदाच गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मकोका

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- गोवंश वाहतूक आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई

अनिल कांबळे
नागपूर, 
Cattle smuggling शहरातील अवैध गोवंश वाहतूक आणि तस्करीविरोधात नागपूर पोलिसांनी प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली. तहसील पोलिसांनी संघटित गुन्हेगारीशी संबंधित एका टोळीविरुद्ध मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर चार आरोपींवर या कठोर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोकाखाली कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद वकील कुरेशी (५२), अब्दुल नवाब कुरेशी (४८), शेख चांद मोहम्मद (४६) आणि जावेद कुरेशी (३०) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी शहरातील विविध भागातील रहिवासी असून, गोवंश तस्करी व संबंधित गुन्ह्यांमध्ये त्यांचा वारंवार सहभाग असल्याचा आरोप आहे.
 
 
go
 (संग्रहित छायाचित्र )
 
तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मुंडे यांनी मकोकाचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त विनीता साहू यांनी आवश्यक मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर मोमिनपुरा परिसरात गस्तीदरम्यान तहसील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्सारनगर येथील नूरानी ग्राऊंडवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत २९ गोवंशांची सुटका करण्यात आली. या जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना चारा-पाणीही देण्यात आले नव्हते. त्यांना कत्तलीसाठी पाठविण्याची तयारी सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सुटका करण्यात आलेल्या सर्व गोवंशांना नंतर गोशाळेत सोडण्यात आले.
२०२० पासून गुन्हेगारीत सक्रिय
तपासादरम्यान संबंधित आरोपी अनेक वर्षांपासून गोवंश तस्करी, पशुक्रूरता, अवैध वाहतूक आणि गोवंश हत्या संबंधित गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुन्हेगारी नोंदी तपासल्यानंतर २०२० पासून या टोळीच्या विरोधात विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मकोका लावण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. मंजुरीनंतर आरोपींवर मकोकाच्या संबंधित कलमांची भर घालण्यात आली.
जामीन मिळणे होणार कठीण
मकोका लागू झाल्यानंतर आरोपींच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. या कायद्यांतर्गत सहज जामीन मिळत नाही. तसेच पोलिसांना अतिरिक्त कोठडीची तरतूद असून दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद आहे. संघटित पशुतस्करी आणि पशुक्रूरतेमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.