राज्यात ठरले पहिले शासकीय रुग्णालय
सर्व डॉक्टरांचे सांघिक प्रयत्न
नागपूर,
Dr. Raj Gajbhiye राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून इतिहास घडविणाºया नागपूरच्या मेडिकलने आता आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असून या कामगिरीमुळे मेडिकलने राज्याच्या वैद्यकीय इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.
एका ४६ वर्षीय शेतकरी रुग्णावर शुक्रवारी यकृत प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. रवी मोहंका यांच्यासह डॉ. गौरव गुप्ता, डॉ. विजय डाकरे, डॉ. जॉन वेस्ली, डॉ. महिंदर सिंग, भूलतज्ज्ञ डॉ. सौरभ कामत, पॅरामेडिकल स्टाफ हर्षद, मल्हार, हरिप्रिया, प्रवीण पुजारी यांना मेडिकलच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रा. डॉ. रितेश बोदाडे, डॉ. चेतन सोनावणे, डॉ. अनिकेत, डॉ. आत्मदीप, डॉ. निनंद, भूल तज्ज्ञ डॉ. वली, डॉ. केतकी रामटेके, डॉ. आदित्य राय, डॉ. इशिका, गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाचे डॉ. अमोल समर्थ, डॉ. अमोल साठवणे यांच्यासह परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांना ‘सुपर’चे प्रशासक डॉ. शैलेश गहुकर, ओएसडी डॉ. सुषमा ठाकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Dr. Raj Gajbhiye यकृत प्रत्यारोपणाचा रिलायन्स हॉस्पिटलसोबत करार झाला असून महिन्यातून दोन दिवस त्यांची चमू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येऊन एकही पैसा न घेता रुग्ण सेवा देत आहे. एका मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबाकडून अवयवदानाची मंजुरी मिळाल्यानंतर या ४६ वर्षांच्या रुग्णाच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. रिलायन्स हॉस्पिटलला याची माहिती देण्यात आली. रात्री चमू नागपुरात पोहचल्यावर लगेचच ९ वाजता यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. ही शस्त्रक्रिया पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल सात तास चालली. विशेष म्हणजे, याचा लाखो रुपयांचा खर्च असतानाही रुग्णाकडून एकही रुपया घेण्यात आला नाही. संपूर्ण खर्च मेडिकल प्रशासनाने उचलला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात पहिल्या किडनी प्रत्यारोपणाचा मान मेडिकलला मिळाला होता. आता पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण करून आम्ही आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केवळ मेडिकलची नव्हे, तर संपूर्ण शासकीय आरोग्य व्यवस्थेची मोठी उपलब्धी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही अत्याधुनिक अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले.