पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींची छेडखानी

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- शहरातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : कारमधील युवकांचे कृत्य
 
अनिल कांबळे
नागपूर, 
molestation of young women उपराजधानीत तरुणी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. टारगट युवक भररस्त्यात तरुणी-महिलांची छेडखानी करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींची शुक्रवारी पहाटे तेलंखेडी परिसरात कारमधील काही युवकांनी छेडखानी केली. अश्लील शब्दांचा वापर आणि विनयभंग होईल असे हातवारे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
 
 
bhaddk
 
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंखेडी हनुमान मंदिर रोड परिसरात दररोजप्रमाणे अनेक युवती पोलिस भरतीच्या तयारीसाठी सराव करीत होत्या. त्याचवेळी लाल रंगाच्या कारमधून आलेल्या काही युवकांनी युवतींवर अश्लील शब्दात छेडखानी करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर काही युवकांनी अश्लील हावभाव केल्याचाही आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक युवती घाबरल्या व संतप्त झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी विरोध केल्यानंतर संबंधित युवकांनी घटनास्थळावरून कारसह पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते. पोलिस दलात भरती होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवतींनाच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पहाटेच्या वेळेत सराव करणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तक्रारीसोबत संबंधित कारचा क्रमांकही पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, वाहन नोंदणी माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अवघड नसल्याचे बोलले जात आहे. महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.