‘जाब द्या, नाहीतर खुर्ची सोडा’

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- विद्यापीठ प्रशासनाविरोधात 'एनएसयूआय'चा एल्गार

नागपूर, 
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून नेशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने गुरुवारी कुलगुरू कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

nsu d 
 
परीक्षा निकालांमध्ये होणारा विलंब, गुणपत्रिकांतील चुका, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील गोंधळ आणि परीक्षा विभागातील कथित अनागोंदी हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे होते. विद्यार्थ्यांनी या समस्यांमुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला.
- कोएम्प्ट कंपनीच्या चौकशीची मागणी
कोएम्प्ट एड्युटेक प्रा. लि. कंपनीच्या कार्यपद्धतीवरही विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परीक्षा भवनातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करून कंपनीशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
- शिष्यवृत्ती आणि भरती प्रक्रियेवर प्रश्न
पीएच.डी. संशोधकांच्या शिष्यवृत्ती व फेलोशिपमधील अडचणी, शिक्षक भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनातील उत्तरदायित्वाचा मुद्दा आंदोलनादरम्यान ठळकपणे मांडण्यात आला.
मुक्त ऐच्छिक विषयाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर टाकला जाणारा अतिरिक्त आर्थिक भार तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली. तसेच अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश प्रक्रियेतील कथित अनियमिततांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
- निवेदनासोबत आरटीआय अर्ज
विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनासोबत शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या प्रती जोडल्या. मात्र, आंदोलनावेळी कुलगुरू अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
- आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयने दिला. यावेळी अजित सिंग, वैष्णवी भरद्वाज, आशिष मांडपे, प्रणय सिंह ठाकूर, आयुष नवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.