कॉमेडीतून वादाचा स्फोट! जुन्या व्हिडीओंचीही होणार चौकशी

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई
pranit more स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील कथित अश्लील आणि आक्षेपार्ह विनोदांवरून निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र झाला आहे. शोमध्ये करण्यात आलेल्या काही वक्तव्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडीओंची सखोल चौकशी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
 

pranit more controversy, Pranit More show controversy 
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणींमुळे संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः एका डॉक्टरशी संबंधित वक्तव्य आणि अन्य काही कथित अश्लील संदर्भांमुळे विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची व्याप्ती वाढली असून केवळ सध्या चर्चेत असलेल्या व्हिडीओंपुरतीच चौकशी मर्यादित न ठेवता यापूर्वीचे सर्व कंटेंट तपासले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे गृह pranit more  राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अशा प्रकारच्या विकृत विनोदांना समाजात स्थान नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल तसेच सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या सर्व व्हिडीओ कंटेंटचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनीही नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित वक्तव्यांबाबत महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितले असून आवश्यक ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सायबर सेलदेखील या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
देहदानासारख्या संवेदनशील विषयांवर आक्षेपार्ह स्वरूपात भाष्य करणे निंदनीय असल्याचे मत व्यक्त करताना पंकज भोयर यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. समाजात कोणत्याही स्वरूपाचा विकृत किंवा अश्लील विनोद प्रोत्साहन देणारी कृती स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.या वादामुळे प्रणित मोरेचा शो पुन्हा एकदा चर्चेत आला असून काही सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शोवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात येत आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्यांशी संबंधित इतर व्यक्तींविरोधातही चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असून या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.