काँग्रेसच्या २४ जणांनी व्हीप पाळला उर्वरितांनी झुगारला
अमरावती,
amravati legislative council विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेत ९४.६८ टक्के मतदान झाले. काँग्रेसचा तटस्थ राहण्याचा व्हीप २४ जणांनी पाळला तर उर्वरितांनी तो झुगारून मतदान केले. भाजपासह अन्य सर्व पक्षाच्या उमेदवारांनी उत्साहात शत:प्रतीशत मतदान केले. भाजपाचे प्रवीण पोटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
एकूण ४५१ मतदारांसाठी ७ ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. निश्चित वेळेपर्यंत ४५१ मतदारांपैकी ४२७ मतदारांनी मतदान केले. त्यात २१४ पुरूष व २१३ महिला मतदारांचा समावेश आहे. धारणीच्या केंद्रावर चिखलदरा व धारणीच्या एकूण ४२ मतदारांनी शंभर टक्के मतदान केले. अचलपूरच्या केंद्रावर चांदूर बाजार व अचलपूरच्या एकूण ६९ मतदारांनी शंभर टक्के मतदान केले. मोर्शीच्या केंद्रावर वरूड, मोर्शी व शेंदूरजना घाट येथील एकूण ८१ मतदरांनी शंभर टक्के मतदान केले. दर्यापूर केंद्रावर अंजनगाव सुर्जी व दर्यापूरच्या ६० पैकी ५९ मतदारांनी मतदान केले. येथील काँग्रेसचा एक नगरसेवक बाहेरगावी गेला होता. अमरावतीच्या भातकुली तहसील केंद्रावर तिवसा व भातकुलीच्या ३८ पैकी २६ मतदारांनीच मतदान केले. तिवसा येथील काँग्रेच्या १२ नगरसेवकांनी पक्षाचा आदेश पाळून मतदान केले नाही. अमरावती तहसील केंद्रावर एकूण ९५ पैकी ८४ मतदारांनी मतदान केले. काँग्रेसचे ११ नगरसेवकांनी पक्षाच्या व्हीपचे पालन करून मतदान केले नाही. चांदूर रेल्वे केंद्रावर धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील ६६ मतदारांनी शंभर टक्के मतदान केले.
जिल्ह्यात काँग्रेसची जवळपास १२० मते होती. त्यापैकी २४ जणांनी मतदान केले नाही. उर्वरितांनी तटस्थतेचा आदेश असताना मतदान केल्यामुळे त्यांनी मतपत्रिकेवर नाव असलेल्या काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना मत दिले की अन्य कोणाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भाजपासह उर्वरीत सर्वच पक्षाच्या मतदारांनी उत्साहात मतदान केले. यातील बहुतांश मते भाजपा उमेदवाराला मिळाल्याचा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना किती मते मिळतात हे पाहावे लागेल. सोमवार २२ जूनला नियोजन भवनात मतमोजणी होणार आहे.
विजय पक्का : प्रवीण पोटे
मतदान सुरू असतानाच प्रवीण पोटे यांनी विजय पक्का असल्याची प्रतिक्रीया माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली. माझे सर्वच नगरसेवकांसोबत चांगले संबंध आहे. गत निवडणुकी प्रमाणे यंदाही मला विक्रमी मते मिळतील. सर्वांचे सहकार्य मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.