इतिहासाच्या जखमांना पडद्यावरचा आवाज

‘बंटवारा 1947’च्या पोस्टर्सनी वाढवली उत्सुकता

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
मुंबई
Bantwara दमदार आणि भावनिक मोशन पोस्टरनंतर आता ‘बंटवारा 1947’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे पोस्टर्स प्रदर्शित करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली साकारत असलेल्या या बहुप्रतीक्षित चित्रपटातून मातृभूमीप्रती असलेले धैर्य, त्याग आणि अटळ जिद्दीची कथा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
 

Bantwara 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पात्रांच्या पोस्टर्समधून चित्रपटाच्या भावविश्वाची झलक पाहायला मिळते. फाळणीच्या अस्थिर आणि वेदनादायी काळातही धैर्य, आशा आणि मानवतेचा दीप जिवंत ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे प्रभावी चित्रण या पोस्टर्समध्ये करण्यात आले आहे. शबाना आझमी या दुर्गावती देवी अर्थात ‘माई’ यांच्या भूमिकेत दिसत असून, सनी देओल यांनी सिकंदर मिर्झा यांची भूमिका साकारली आहे. प्रीती जी. झिंटा हमीदा बेगम यांच्या भूमिकेत झळकणार असून, करण देओल जावेद मिर्झा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अली फझल हबीब अन्वर तर अभिमन्यू सिंह याकूब खान यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.या पोस्टर्समधील प्रत्येक पात्राच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव त्यांच्या संघर्षाची आणि मनोबलाची कहाणी सांगतात. आपल्या आजूबाजूचे जग कोसळत असतानाही न डगमगता उभे राहणाऱ्या या व्यक्तीरेखा चित्रपटाच्या कथानकाला भावनिक खोली प्रदान करतात. त्यामुळे ‘बंटवारा 1947’ हा केवळ ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट न राहता मानवी भावभावना, नातेसंबंध आणि अस्तित्वाच्या लढ्याची कहाणी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
 
निर्मात्यांनी प्रदर्शित केलेले Bantwara किशन या पात्राचे पोस्टर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातील भावनिक ताकद आणि आशयपूर्ण मांडणीमुळे चित्रपटाची संवेदनशील बाजू अधोरेखित होताना दिसते. चित्रपटाची ताकद केवळ त्याच्या भव्य कलाकारांमध्ये नसून त्यामागील समर्पण, भावनिक गाभा आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये दडलेली असल्याची झलक या पोस्टर्समधून पाहायला मिळते.विशेष म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि अभिनेते सनी देओल यांची जवळपास तीन दशकांनंतरची ही बहुप्रतीक्षित पुनर्भेट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचेही विशेष लक्ष लागले आहे.‘बंटवारा 1947’चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले असून, चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. गीतलेखनाची जबाबदारी जावेद अख्तर यांनी सांभाळली आहे. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फाळणीच्या इतिहासातील वेदना, संघर्ष आणि मानवी जिद्दीची कहाणी सांगणारा हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.