धर्मांतरण प्रकरणातील मौलवीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
- धर्मांतरण व लैंगिक शोषण प्रकरण : धक्कादायक खुलाशांची शक्यता
 
अनिल कांबळे
नागपूर, 
case of conversion सैनिकाच्या पत्नीचे बळजबरी धर्मांतरण आणि लैंगिक शोषण करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार हजरत मौलवी याला बुधवारी मध्यरात्री अटक केली. आज गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया परिसरात लपून बसलेल्या मौलवीकडून या प्रकरणात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. देशाच्या रक्षणार्थ सिमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबाशी निगडीत असल्यामुळे गाजलेल्या या प्रकरणातील प्रमुख तिनही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.
 
 
conversion
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैनिकाची पीडित पत्नी आणि अय्याज ताज मदारे (२६, कळमेश्वर) यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत अय्याज मदारेने तिच्याशी सलगी वाढवून संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला गुंगीकारक औषध पाजून तिच्याबर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर महिलेचे काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला साथिदार अमीन शेख (३०) याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. या दोघांनी मिळून मध्यप्रदेश- छिंदवाड्यातील मौलवी हजरत याच्याशी संपर्क साधून महिलेचे धर्मांतरण करण्याचा कट रचला. त्यासाठी तिच्यावर मंत्र-तंत्र करुन तिचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न मौलवीने केला. नागपुरातील एका नामांकित हॉटेलमधे घडलेल्या या धर्मांतरण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मौलवी हजरत, अय्याज मदारे आणि अमिन अलीचे बींग फुटले. या प्रकरणात यापूर्वीच अय्याज ताज मदारे (२६) आणि अमीन शेख (३०) दोन्ही रा. कळमेश्वर, यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत आणखी ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तपासादरम्यान पीडितेवर धर्मांतरणासाठी कथित दबाव टाकणे, लैंगिक शोषण, आर्थिक व्यवहार तसेच या संपूर्ण रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग या सर्व मुद्द्यांवर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. नव्याने अटक करण्यात आलेल्या मौलवीकडून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण घटनाक्रमाचा पोलिस कसून तपास करीत आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.