जावेद जाफरी कुटुंबीयांना कोट्यवधींचा धक्का; तपासात खळबळजनक उलगडा

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
मुंबई
Javed Jaffrey fraud case अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी आणि कुटुंबीयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी तपासात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे निलंबित सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस (LOC) जारी करण्यात आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने तपास अधिक तीव्र केला आहे.
 
 

Javed Jaffrey fraud case 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यात परदेशात फरार झालेला हवाला ऑपरेटर नीरव गोकानी याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो दुबईला पळून गेल्याची माहिती असून, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, महेश पाटील यांच्यापर्यंत निधी पोहोचण्यापूर्वी तो अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आला होता.
 
 
या प्रकरणात यूकेस्थित व्यावसायिक निशित पटेल यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. वांद्रे पश्चिम येथील ‘न्यू कमलकुंज’ या पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आश्वासन देत जाफरी कुटुंबीयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात तब्बल १६ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
प्रकरणाच्या तपशीलानुसार, एप्रिल २०२४ मध्ये हबीबा जाफरी यांना अंधेरी येथील त्यांच्या बंगल्याच्या मालमत्ता करारासंदर्भात महापालिकेकडून नोटीस मिळाली होती. त्यानंतर महेश पाटील यांनी कर सेटलमेंटचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. याच दरम्यान त्यांना ‘न्यू कमलकुंज’ प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यानंतर कथित फसवणुकीची साखळी सुरू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात गुन्हे Javed Jaffrey fraud case  शाखेकडून झवेरी बाजार परिसरात चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसे वळवले गेले असल्याचा संशय असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, आरोपी महेश पाटील हे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून आणखी काही व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.