अखेर रोजच्या त्रासातून शिक्षकांची सुटका

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
माहिती देण्याचा वार ठरला शनिवार
 
अमरावती, 
Major relief for teachers वरिष्ठ पातळीवरून सातत्याने दिवसभरात विविध प्रकारची माहिती शालेय शिक्षकांकडून मागविली जाते. त्यामुळे शिक्षकांना अध्ययन करण्यास वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहेत. शिक्षकांना शैक्षणिक कार्यापेक्षा अशैक्षणिक कामेच अधिक करावी लागत असल्याची ओरड सर्व स्तरातून होत असली तरी याकडे फारसे कुणीच लक्ष देत नसल्याने शिक्षक हैराण झाले होते. या सार्‍या बाबींचा विचार करून शासनाने आता ‘माहितीचा वार शनिवार’ ठेवण्याचे निश्चित केल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ पातळीवरून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन, ऑफलाईन माहिती दररोज द्यावी लागणार नसून ही माहिती आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.
 
 
teacher
 
सद्य स्थितीत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. तसेच जिल्हास्तर, तालुकास्तर व केंद्रस्तरावरही माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे शिक्षकांचा अध्ययन, अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, बीड जिल्ह्यातील आष्टी, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये ‘माहितीचा वार शनिवार’ या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली.
 
 
यामध्ये आठवड्याभरात जी काही माहिती ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात मागवली होती ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळवले होते. या पथदर्शी अभ्यासक्रमांच्या उपक्रमात सहभागी असलेल्या ९० टक्के शिक्षकांनी स्वागत केले, तर ९६ टक्के शिक्षकांनी शिकवण्यासाठी यामुळे पुरेसा वेळ मिळाल्याचे मत नोंदवले. ‘माहितीचा वार शनिवार’ ठेवल्यामुळे सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात शिक्षकांची सुटका झाल्याचे समाधान व्यक्त केल्या जात आहे.