मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष

उत्तर अमेरिकेतील मराठी चित्रपट महोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती;

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
मुंबई
NAFA Film Festival उत्तर अमेरिकन चित्रपट संघटनेतर्फे आयोजित तिसरा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ हा येत्या ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे होणार असून या प्रतिष्ठित महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करणाऱ्या या महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.
 

NAFA Film Festival 2026, North American Film Association 
उत्तर अमेरिकन चित्रपट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे औपचारिक निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच मराठी आणि भारतीय कलाविश्वाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. संस्थेच्या दृकश्राव्य माध्यमावरील प्रसारण उपक्रमाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीतकार गुरु ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे आणि गिरीजा ओक यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची रंगत अधिक वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत या NAFA Film Festival  महोत्सवाने मराठी चित्रपट, संस्कृती आणि भारतीय कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायाला मायदेशातील कलावंतांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा महोत्सव सातत्याने करत आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ चित्रपटांचे प्रदर्शन करणारा उपक्रम न राहता कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि रसिक यांना एकत्र आणणारा सांस्कृतिक दुवा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
यंदाच्या महोत्सवाकडे मराठी चित्रपटसृष्टीसह जगभरातील मराठी रसिकांचे लक्ष लागले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपटांचे प्रदर्शन, परिसंवाद आणि कलाकारांच्या सहभागामुळे हा महोत्सव विशेष ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.