अचलपुरात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
 
अचलपूर, 
Voting in Achalpur विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदाना दरम्यान मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी आज परतवाडा पोलिस ठाण्यात काँग्रेसच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेतील गोपनीयतेचे नियम मोडून मतदान करताना मतपत्रिकेचा फोटो काढल्याचा आरोप संबंधित नगरसेवकावर करण्यात आला आहे.
 
 
fir
 
माहितीनुसार, अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करताना नगरसेवक मो. सईद सादिक (वय ५०) यांनी मतपत्रिकेचा फोटो मोबाईलमध्ये काढल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार निवडणुकीतील गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी अचलपुरचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सुदर्शन सहारे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मतदानाची गोपनीयता भंग करणे हा दंडनीय गुन्हा असून दोषी आढळल्यास कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. दरम्यान, अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. उपलब्ध माहितीनुसार, संबंधित मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि गोपनीयता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, मतदान केंद्रांवर नियमभंग करणार्‍यांविरुद्ध यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.