गावात घुसलेल्या रानडुकराचा धुमाकूळ

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
हल्ल्यात दोघे जखमी
तिवसा, 
wild boar in the village तिवसा तालुक्यातील शेंदोळा (धस्कट) गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गावातील दोन नागरिक घरासमोर आपल्या कामात व्यस्त असताना अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
ran dk
 
सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास धनंजय सुभाष रोडे (वय ३०) व विष्णूजी बोरकर (वय ५६) हे आपल्या घरासमोर दैनंदिन काम करत होते. याचवेळी अचानक जंगल परिसरातून एका रानडुकराने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे दोघांनाही सावरण्याची संधी मिळाली नाही. रानडुकराने केलेल्या तुफानी हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि रानडुकराला गावाच्या परिसरातून हुसकावून लावत जखमींना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून तिवसा तालुक्यातील शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढला असून पिकांचे नुकसान तर होतच आहे, मात्र आता थेट नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे, वनपाल नंदकिशोर ठाकरे, वनरक्षक चेतन हिवराळे, वनरक्षक गिरुळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली. वनविभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवावे, अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.