‘गजरा’च्या थरारक पोस्टरने वाढवली उत्सुकता

अदा शर्माचे मराठीत पदार्पण

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई
Gajra Marathi Movie आशयघन विषय आणि नवनवीन प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची भर पडणार आहे. ‘झिगझॅग प्रॉडक्शन’ आणि ‘गणराज स्टुडिओज’ यांच्या आगामी ‘गजरा’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
 

Gajra Marathi Movie 
प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अदा शर्मा एका अत्यंत रौद्र आणि रहस्यमय रूपात दिसत आहेत. रक्ताने माखलेला चेहरा, कपाळावर उठून दिसणारे कुंकू, नाकातील पारंपरिक नथ आणि डोळ्यांमधील तीव्र भाव यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमधील हा प्रभावी लूक पाहता ‘गजरा’ हा चित्रपट एका गंभीर आणि थरारक कथानकावर आधारित असल्याचे संकेत मिळत आहेत.
निर्मात्यांच्या माहितीनुसार, ‘गजरा’ हा चित्रपट समाजातील सत्य घटनांवर आधारित असून एका संवेदनशील आणि गंभीर विषयावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्रेयस जाधव करत आहेत. आपल्या वेगळ्या शैलीतील कथाकथनासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस जाधव यांचा हा चौथा चित्रपट असून तो प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची निर्मिती अमोल बोरकर यांनी केली आहे.
चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी सांगितले की, “‘गजरा’ची मूळ संकल्पना आणि त्यामागील सत्य घटना अमोल बोरकर यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरेल, याची खात्री वाटली. ही कथा अत्यंत तीव्र, संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी आहे. सध्या कथेबाबत अधिक माहिती देणे शक्य नसले तरी हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल.”अदा शर्माच्या  Gajra Marathi Movie  निवडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “या भूमिकेसाठी निरागसता आणि रौद्रता या दोन्ही भावना प्रभावीपणे साकारू शकणाऱ्या अभिनेत्रीची आवश्यकता होती. अदा शर्मापेक्षा योग्य पर्याय आम्हाला दुसरा वाटला नाही. पोस्टरमध्ये दिसणारी झलक ही केवळ सुरुवात आहे. चित्रपटात प्रेक्षकांना तिचा एक वेगळाच अभिनय अनुभवायला मिळेल.”चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी सांभाळली असून, त्यांच्या संगीतामुळे चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक प्रभावी आयाम मिळतील, अशी अपेक्षा आहे.
 
‘गजरा’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अदा शर्माचा पोस्टरमधील लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या पदार्पणाकडे चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.