मुंबई
Shodhu Kuthe Navri आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये निर्माण केलेली उत्सुकता आता आणखी वाढली आहे. चित्रपटातील ‘शोधू कुठे नवरी?’ हे नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, योग्य जोडीदाराच्या शोधातील गंमत, गोंधळ आणि त्यामागील स्वप्नरंजन हलक्याफुलक्या अंदाजात या गाण्यातून मांडण्यात आले आहे.
‘स्वप्नसुंदरी’च्या टीझरमधून अभिनेता भूषण प्रधान आपल्या स्वप्नातील जोडीदाराच्या शोधात असल्याची झलक पाहायला मिळाली होती. त्याच कथानकाला पुढे नेत ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणे चित्रपटातील नायकाच्या मनातील भावना आणि त्याच्या शोधयात्रेतील मजेशीर प्रसंग उलगडते. आकर्षक शब्दरचना, उत्साही संगीत आणि विनोदी मांडणी यामुळे हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
या गाण्याला प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या गाण्यांमुळे लोकप्रिय असलेल्या कुणाल गांजावाला यांनी आपल्या खास शैलीत या गाण्याला वेगळी ऊर्जा दिली आहे. गाण्याचे बोल प्रशांत मडपुवार यांनी लिहिले असून संगीतकार अंकुश बोरडकर यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
गाण्याविषयी बोलताना Shodhu Kuthe Navri दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांगितले की, “‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात असलेल्या आदर्श जोडीदाराच्या शोधाची कथा मांडतो. ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणे त्या शोधातील मनोरंजक आणि हलक्या क्षणांना अधोरेखित करते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबाबत काही अपेक्षा आणि कल्पना असतात. त्या भावना या गाण्यात विनोदी आणि रंजक पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत. कुणाल गांजावाला यांच्या आवाजामुळे गाण्याला आणखी वेगळे रूप प्राप्त झाले आहे. प्रेक्षकांना हे गाणे निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे.”रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाची निर्मिती सतीश महादेव गेजगे यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केले असून कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.लग्नसंस्था, नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि स्वप्नातील जोडीदाराच्या शोधाभोवती फिरणारी मनोरंजक कथा असलेला ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर आता प्रदर्शित झालेल्या या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.