पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना
मोताळा,
MLA Sanjay Gaikwad मोताळा तालुयातील वैदुवाडी (बोराखेडी) येथे नागरिकांना भेडसावणार्या पाणीटंचाईसह विविध मूलभूत समस्यांची माहिती मिळताच आ. संजय गायकवाड यांनी संबंधित अधिकार्यांसमवेत गावाला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकर्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी अधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार गायकवाड यांनी संबंधित ग्रामसेवक आणि अधिकार्यांना कठोर शब्दांत निर्देश देत, गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत गाव सोडायचे नाही. आजच्या आज नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश दिले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास त्वरित कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी चर्मकार समाजाच्या नागरिकांनी समाजासाठी समाजमंदिर व सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागेची मागणी मांडली. या मागणीची दखल घेत आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी रविदास भवन उभारण्याची तात्काळ घोषणा केली. या भवनाचे काम येत्या काही दिवसांत पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. बैठकीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शासकीय योजनांचा लाभ, सार्वजनिक सुविधा आणि इतर विकासकामांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची जबाबदारी अधिकार्यांनी घ्यावी, तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश आ. गायकवाड यांनी दिले. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, माता-भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नागरिकांनी विविध प्रश्न मांडले तर आमदार गायकवाड यांनी त्यांचे निराकरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.