भंडारा :
OBC Community Census ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला माजी खासदार सुनील मेंढे यांनी भेट देऊन आंदोलक बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित ओबीसी समाजाच्या मागण्या रास्त असल्याचे मत व्यक्त केले.
सध्या प्रचंड उष्णतेचे दिवस सुरू असून अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मेंढे यांनी सांगितले. आंदोलन तात्पुरते स्थगित करून पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात ते सुरू ठेवण्याची विनंतीही त्यांनी आंदोलकांना केली.
केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी जनगणनेच्या विषयावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून आगामी जनगणना दोन ते तीन टप्प्यांत होणार असल्याचे व पहिल्या टप्प्यात कुटुंब व घरांची प्राथमिक माहिती संकलित केली जाणार असून त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र माहिती नोंदविण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे संकेत मिळाले आहेत असे ते म्हणाले.
स्वतंत्र जनगणनेमुळे समाजाचे वास्तव चित्र समोर येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व सामान्य कुटुंबांना शासनाच्या योजना, शिक्षण व रोजगार क्षेत्रात अधिक न्याय मिळण्यास मदत होईल.आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकार व वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन देत आवश्यक असल्यास आंदोलकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून चर्चा करू, असे मेंढे यांनी सांगितले.
OBC Community Census या प्रसंगी सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, डॉ. बालकृष्ण सार्वे, भगीरथ धोटे, रोशन उरकुडे, रमेश शहारे, विष्णूदास जगनाडे, पंजाब कारेमोरे, मोरेश्वर तिजारे, पुंडलिक निखाडे, किसन शेंडे तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.