ब्रम्हपुरी,
Student Drowns in Donge Ghat शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदगाव रस्त्याजवळील (नाला) डोंगे घाट येथे मंगळवार, 2 जून रोजी सकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात बुडून मृत्यू झाला. नैतिक अशोक शेंडे (16, रा. जानी वार्ड, ब्रम्हपुरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो ख्रिस्तानंद स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता.
मृतक नैतिक शेंडे हा वनविभागात मजूर म्हणून कार्यरत असलेले अशोक शेंडे यांचा मुलगा होता. नैतिक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता. बास्केटबॉल खेळून झाल्यानंतर नैतिक आणि त्याचे मित्र सौम्य अतुल ढोक व जय योगेश राऊत हे तिघे सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास चांदगाव रस्त्यावरील डोंगे घाटात अंघोळ करण्यासाठी गेले. घाटावर पोहोचल्यानंतर मी पहिले पाण्यात जातो, त्यानंतर तुम्ही या, असे मित्रांना सांगून नैतिकने पाण्यात उडी घेतली. मात्र, डोंगे घाटावरील तो भाग अत्यंत खोलगट असल्याने नैतिकला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला.
नैतिक पाण्यात दिसेनासा झाल्यानंतर त्याचा मित्र सौम्य ढोक याने तातडीने धावत जाऊन सकाळी 8 वाजताच्या सुमारास नैतिकचे वडील अशोक शेंडे यांना घटनेची माहिती दिली. मुलाचा मित्र धापा टाकत घरी पोहोचला आणि त्याने नैतिक पाण्यात बुडाला आहे, लवकर चला, असे सांगताच शेंडे कुटुंबावर आभाळ कोसळले. वडिलांनी तात्काळ चांदगाव रोडवरील नाल्याकडे धाव घेतली. घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच चांदगाव रोडवरील नाला डोंगे घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्थानिक नागरिक आणि काही पोहणार्या तरुणांनी तातडीने पाण्यात उतरून नैतिकचा शोध सुरू केला. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता आणि नैतिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली असून, ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात मृतकाचे वडील अशोक शेंडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास सुरू आहे. एका उमद्या आणि क्रीडाप्रेमी विद्यार्थ्याचा असा अकाली मृत्यू झाल्याने ब्रम्हपुरी शहरावर शोककळा पसरली आहे.