यवतमाळ,
Harishchandra Rathod इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक प्रशिक्षणासाठी राज्याचे प्रतिनिधी म्हणून येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ हरिश्चंद्र नर्मदा बद्रीनाथ राठोड यांची निवड करण्यात आली आहे. 11 ते 18 जुलैदरम्यान होणाèया या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रशिक्षणात देशातील विविध राज्यातील निवडक व अनुभवी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी देशभरातून अर्ज आले होते. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तब्बल 21 वर्षांचे सातत्यपूर्ण योगदान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवसेवा, बचाव कार्य आणि प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा विचार करून राठोड यांची निवड करण्यात आली. कोविड-19 महामारीच्या कठीण काळात त्यांनी ‘कम्युनिटी किचन’ उपक्रम सुरू करून अनाथ, बेघर, परप्रांतीय मजूर, दिव्यांग व इतर गरजूंना दररोज दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करून दिली. त्यांच्या या मानवतावादी कार्याची विविध स्तरांवर प्रशंसा झाली.
हरिश्चंद्र राठोड राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारत सरकार, राज्य शासन तसेच यशदातून प्रशिक्षित अधिकृत प्रशिक्षक आहेत. ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मेडलियन प्रमाणपत्रधारक असून प्रथमोपचार विषयाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. सध्या ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी, यवतमाळ जिल्हा शाखेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.