नितेश राणे यांचे प्रताप अडसडांना आश्वासन
धामणगाव रेल्वे,
Nitesh Rane धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यात भोई समाज अधिक प्रमाणात आहे; मात्र अनेक योजनापासून वंचित असल्याने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच पारंपारिक व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भोई समाजाच्या मागण्याचे निवेदन आमदार अडसड यांनी स्वतः मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन दिले. यावर भोई समाजाच्या समस्यांवर लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन नितेश राणे यांनी प्रताप अडसड यांना दिले.
या तीनही तालुक्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहे. या सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मत्स्य विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच भोई समाज या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना राबविणे महत्त्वाचे आहे. अनेक तलाव व धरणांवर इतर घटकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात येऊन भोई समाज बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी व धामणगाव मतदारसंघातील भोई समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी नितेश राणे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्वरित बैठक लावून सकारात्मक चर्चा करण्यात येईल व न्याय देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी नितेश राणे यांनी आमदार अडसड यांना दिले.