साखरवाही येथील महामाया कोल वॉशरीजची पाहणी

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
*68 लाखांच्या प्रलंबित नुकसानभरपाईबाबत कार्यवाहीच्या सूचना
*शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आ. मुनगंटीवारांचा निर्णायक पुढाकार

चंद्रपूर, 
Sakharwahi Mahamaya Coal Washeries चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा धूळ प्रदूषणामुळे शेतीपिकांचे नुकसान सहन करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णायक पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली असून, साखरवाही येथील महामाया कोल वॉशरीजची प्रत्यक्ष पाहणी करून प्रदूषणामुळे होणारे शेतीचे नुकसान, प्रलंबित नुकसानभरपाई आणि भविष्यातील प्रभावी भरपाई यंत्रणा यांचा आढावा घेण्यात आला.
 
 
coal
 
यावेळी राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, जिल्हाधिकारी वसूमना पंत, तहसीलदार विजय पवार, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच महामाया कोल वॉशरीजचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी साखरवाही परिसरातील शेतकर्‍यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. महामाया कोल वॉशरीजच्या कोळसा धूळ प्रदूषणामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, कंपनीकडून शेतकर्‍यांना देय असलेली सुमारे 68 लाख 61 हजार 864 रुपयांची नुकसानभरपाई अद्याप वितरित करण्यात आलेली नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
 
 
 
कृषी विभागाने पिकनिहाय नुकसानीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी स्पष्ट आणि शास्त्रीय सूत्र विकसित करावे. प्रत्यक्ष किती प्रमाणात नुकसान झाले आहे याचा सविस्तर अभ्यास करून त्याची नोंद घ्यावी तसेच संबंधित अहवाल अपर मुख्य सचिव (महसूल) आणि जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावा, अशा सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. महामाया कंपनीच्या कोळसा धुळीमुळे केवळ शेतीपिकांचेच नव्हे तर जमिनीच्या गुणवत्तेचेही नुकसान होत असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी ठोस धोरण तयार करणे तसेच कंपनी परिसरात ग्रीन वॉल उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोळसा कंपन्यांकडून कोळशामध्ये धुळीचे मिश्रण करून पावर स्टेशनला पुरवठा केला जात असल्याने तेथील बॉयलरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दाही आ. मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.