तिवसाघाटचे ग्रामस्थ आक्रमक
वरूड,
Smart meter opposition तालुक्यातील ग्राम तिवसाघाटमध्ये स्मार्ट मिटरच्या विरोधात ग्रामवासीयांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे स्मार्ट मिटरच्या वाढीव बिलावरून चांगलेच वातावरण तापल्याचे दिसून आले. याप्रकरणी ग्रामस्थांनी एकत्रित येत महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता, नायब तहसीलदार पंकज चव्हाण व शे.घाटचे ठाणेदार राहुल गवई यांना निवेदन सादर केले आहे.
संपुर्ण विद्युत ग्राहकांच्या घरी त्यांना विश्वासात न घेता स्मार्ट मिटर बसविण्याचे काम महावितरण विभागाने पूर्ण केलेले आहे. स्मार्ट मिटर बसविल्यापासून विद्युत ग्राहकांना पुर्वीपेक्षा अधिक बिल येत असल्याने समान्य जनतेची सर्रास लुट होत आहे. महावितरण कार्यालयात या संबधीत ग्रामवासीयांनी अनेकवेळा तोंडी अथवा लेखी तक्रारी दिल्या आहे. तक्रार देऊन सुध्दा यावर कुठलीच ठोस कार्यवाही महावितरण विभागाच्या वतीने करण्यात आली नाही. उलट उडवा उडवीचे उत्तर देऊन वीज कनेक्शन धरकांना तुम्हाला बिल भरावेच लागेल, आम्ही यावर काहीच करु शकत नाही, असे निराशजनक उत्तरे देवून वीज ग्राहकांची कार्यालयातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे बसविण्यात आलेले स्मार्ट मिटर तत्काळ काढून घेऊन परत जुनेच मिटर बसविण्यात यावे अन्यथा सर्व वीज कनेक्शन धारक बसविलेले स्मार्ट मिटर काढून कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आहे. यावर संबंधित विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा होणार्या संपूर्ण परिणामास महावितरण कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामवासीयांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण विभागाच्या वतीने काय भुमिका घेण्यात येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.