वेध
girls in Online friendship मागील वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मागील वर्षभरात महाराष्ट्रात किती महिला आणि मुली बेपत्ता झाल्या, याची आकडेवारी सांगितली. ही आकडेवारी आहे, 37 हजार 695 ! ही आकडेवारी केवळ एका राज्याची आहे. सर्व राज्यांची आकडेवारी पाहायला जायचे, तर डोळे पांढरे होतील, इतकी भयावह स्थिती आहे. ही आकडेवारी केवळ महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आहे. वर्षभरात किती मुलींवर अत्याचार झाले ? किती मुलींना छेडखानीला सामोरे जावे लागले ? किती मुलींनी अत्याचारामुळे आत्महत्या केल्या किंवा त्यांच्या हत्या झाल्या ? या प्रश्नांची उत्तरे जर आपण मिळवायला लागलो, तर आपल्याला निश्चितच निराशा येईल. त्यामुळेच कदाचित आज आपण वृत्तपत्रांत छापून येणाèया अशा प्रकारच्या बातम्या पाहून न पाहिल्यासारखे करत असू किंवा ‘हे नित्याचेच’, असे म्हणून वर्तमानपत्र बाजूला ठेवत असू; पण कधीतरी स्वतःच्या मुलींविषयी असे काही झाले तर..? हा प्रश्न आपल्याला निश्चितपणे अस्वस्थ करतो. हा प्रश्न जर आपल्याला अस्वस्थ करत असेल, तर आपण संवेदनशील पालक आहात आणि त्यामुळेच केवळ विचार न करता या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आपण पालकांनी निश्चितच विचार करायला हवा.
सध्या लव्ह जिहादचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आधी फूस लावायची नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर धर्मांतर करायला लावायचे, असे प्रकार घडताहेत. कोणत्या समुदायातील लोक कोणत्या मानसिकतेतून हे सर्व करताहेत, हा मुद्दा सर्वांनाच माहिती आहे. पण, यात एका विषयाकडे समाज सोईस्कररित्या दुर्लक्ष करतोय आणि तो म्हणजे मुलींचे वाहावत जाणे. एका विशिष्ट वयापर्यंत मुलींना जपावे लागते, असे आपण पूर्वापार ऐकत आलोय्. इथे पालक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. पण, आता हातातील मोबाईलमुळे मुला-मुलींच्या आकलनाच्या कक्षा प्रचंड विस्तारल्या आहेत. सर्व विषयातील सर्वच ज्ञान ते मोबाईलच्या माध्यमातून मिळवतात. समाज माध्यमांवर अगदी अनोळखी लोकही एकमेकांना फॉलो करतात. तरुण मुलं-मुली प्रोफाईलवर स्वत:चा आकर्षक फोटो ठेवतात. तो फोटो पाहून मैत्रीचे प्रस्ताव येतात आणि ते स्वीकारले जातात. माझे इतके मित्र आहेत, माझे इतके फॉलोअर्स आहेत, हा या वर्गामध्ये प्रतिष्ठेचा विषय असतो. मात्र, आपण ज्यांच्याशी मैत्री करतोय तो मुलगा किंवा मुलगी खरंच मैत्री करण्यास योग्य आहेत का, याचा विचार केला जात नाही. आपण फक्त मुलींच्या बाबतीत हा विचार केला तर 16 ते 18 या वयोगटातील मुली अगदी चांगले नाव, स्टायलिश फोटो पाहूनच हुरळून जातात. मग त्या स्वत:चेही आकर्षक फोटो टाकायला लागतात. मैत्रीला सुरुवात होते आणि त्यासोबतच एकमेकांना रिझवण्याचे प्रयत्न सुरू होतात. काहीजण तर इतके ‘क्रेझी’ असतात की एकमेकांविषयीच्या अपडेट्स तासा-तासाने देत असतात. या मैत्रीतून मग कधी अधिकार गाजवणे सुरू होईल, हे तिला कळतच नाही. तू हा ड्रेस घालत जा, हा नको घालू, तू अमक्याशी नको बोलू, घरच्यांचे अमूक म्हणणे मनावर नको घेऊ इथवर सूचना केल्या जातात. गोडीगुलाबीने सुरू होऊन ही मैत्री कोणत्या दिशेने जाणार असते, याची पुसटशी जाणीवही त्या मुलीला तेव्हा येत नाही. जेव्हा जाणीव होते तेव्हा कदाचित उशीर झालेला असतो. नंतर तुम्ही पोलिसात जा किंवा जीवाचे बरेवाईट करा, परिणाम घडून गेलेला असतो. म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा कौटुंबिक संवादावरच येऊन थांबतो. कुटुंबात पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद हवा. मुलीने किंवा मुलाने पालकांना स्वत:हून रोजचे अनुभव सांगणे, ही प्रक्रिया स्वाभाविकपणे घडली पाहिजे. असे झाले तरच मोठे अनर्थ वेळीच टाळले जाऊ शकतात.
मुलींनी याबाबतीत सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मुलगी वाहावत गेली नाही तर पुढचे परिणाम तिला भोगावेच लागणार नाहीत. कारण जी गोष्ट वाहावत जाते, ती पुढे जाऊन बुडणार, हे नक्कीच असते. नवनवीन तंत्रज्ञानाचा, संवाद माध्यमांचा वापर जरूर करावा. पण, सोबत आपली विवेकबुद्धी जागृत असू द्यावी. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणाशीही फारसा परिचय नसताना मैत्री करण्याच्या भानगडीत पडूच नये. समाज माध्यमांचे जग फार मोठे आणि क्लिष्ट आहे. कोणीतरी तुमच्याशी खोट्या नावाने मैत्री करत असेल तर तुम्ही ते बरेचदा ओळखू शकत नाही. म्हणून समाज असो किंवा समाज माध्यम असो, कमळासारखे राहावे. जेणेकरून आजुबाजूला कितीही चिखल असला तरी फुलाला त्याचा स्पर्श होत नाही. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे म्हणण्याच्या पुढे जात ‘मुलगी जागरूक झाली, सुरक्षित राहिली’ असे म्हटले पाहिजे.
सोनाली पवन ठेंगडी