तभा वृत्तसेवा
माहूर,
shri-renukadevi-sansthan : येथील श्री रेणुकादेवी संस्थानद्वारा विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दानपेट्यांची शनिवार, 20 जून रोजी उघडण्यात आल्या. यावेळी दानपेट्यांमधील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची मोजणी करण्यात आली. या प्रक्रियेत तब्बल 1 कोटी 35 लाख 95 हजार 218 रुपयांची प्राप्ती झाल्याचे दिसून आले.
संस्थानाच्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी सीलबंद करण्यात आलेल्या एकूण 11 दानपेट्या उघडण्यात आल्या. यामध्ये सभामंडपातील 4, महालक्ष्मी माता मंदिरातील 1, तुळजाभवानी माता मंदिरातील 1, मंदिर परिसरातील 2 तसेच परशुराम मंदिराकडील 3 दानपेट्यांचा समावेश होता.
ही उघडणी श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे तसेच सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. दानपेट्यांमधील सोन्या-चांदीच्या वस्तूंची तपासणी संस्थानचे अधिकृत सोनार सुशील टाक यांनी केली.
दानपेट्यांमधून प्राप्त रोख रकमेची मोजणी केल्यानंतर 43 लाख 73 हजार 713 रुपये इतकी रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच दानपेट्यांमधून 98 ग्रॅम सोने, 13 सोन्याचे नग, 2.801 किलो चांदी व परशुराम पाळण्यातून 2.296 किलो चांदी प्राप्त झाली.
याशिवाय 9 एप्रिल ते 20 जून या कालावधीत संस्थानाला विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात देणग्या प्राप्त झाल्या. देणगी विभागामार्फत 40 लाख 36 हजार 153 रुपये, साडी-पातळ विक्रीतून 30 लाख 40 हजार 222 रुपये तसेच ऑनलाइन देणगी स्वरूपात 21 लाख 45 हजार 130 रुपये जमा झाले. पावत्यांद्वारे प्राप्त देणग्यांमध्ये 21.440 ग्रॅम सोने व 3 किलो 637 ग्रॅम 740 मिली चांदी यांचाही समावेश आहे.
या सर्व प्राप्तीचा एकत्रित विचार करता, श्री रेणुकादेवी संस्थानला या कालावधीत एकूण 1 कोटी 35 लाख 95 हजार 218 रुपये इतकी मोठी देणगी प्राप्त झाली आहे. भाविकांचा रेणुकामातेवरील दृढ विश्वास व श्रद्धा यामुळे संस्थानाच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
संस्थान प्रशासनाने भाविकांचे आभार मानत सर्व देणग्यांचा वापर धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांसाठी पारदर्शकपणे केला जाईल, असे सांगितले. तसेच अधिक महिना असल्याने आई रेणुकामातेला पितळ, तांबे व स्टीलचे भांडे अर्पण करण्यात आले होते. या सर्व वस्तूंची नोंद श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी करून ठेवली आहे.