बोलेरो पिकअपसह डीपी जळून खाक

तेंडोळीतील दुपारची घटना

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
dp-burnt-down-with-bolero-pickup : आर्णी तालुक्यातील तेंडोळी येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून बोलेरो पिकअप वाहन, वीज वितरणाची डीपी तसेच अंगणवाडी परिसरातील पाण्याची टाकी व सोलर पॅनेल जळून खाक झाल्याची घटना सोमवार, 22 जूनला दुपारी 3 च्या दरम्यान घडली.
 
 
 
y22Jun-Tendoli
 
 
 
शंकर ठाकरे यांच्या मालकीचे बोलेरो पिकअप वाहन डीपीजवळ उभे असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत वाहनासह डीपीलाही विळख्यात घेतले. आगीच्या झळा बाजूला असलेल्या अंगणवाडी परिसरापर्यत पोहोचल्याने तेथील पाण्याची टाकी व सोलर पॅनेलही जळून खाक झाले.
 
 
घटना कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे. आर्णी बाजार समितीचे उपसभापती परशराम राठोड यांनी नगर परिषद अध्यक्ष नालंदा भरणे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने अग्निशमन वाहन तेंडोळी येथे पाठविले.
 
 
अग्निशमन कर्मचान्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यावेळी नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने, तलाठी आशिष पांचोरे, तलाठी ममता पवार, हरदास सहारे, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र देशभुख यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अग्नीशमन दलाने वाचवले
 
 
अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने आग नियंत्रणात आली. अन्यथा आजूबाजूच्या घरांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकला असता, असे नागरिक परशराम राठोड यांनी सांगितले.