तिवसा,
mahasarathi-portal : राज्य शासनाच्या नव्या डिजिटल सेवा धोरणामुळे महा-ई-सेवा व आधार केंद्र चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यभरातील केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने व्हट्सअॅपद्वारे शासकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला, तरी यापूर्वीपासून अस्तित्वात असलेले सेवा पोर्टल, ग्रामपंचायत स्तरावरील आयडी तसेच महाविद्यालयीन स्तरावरील आयडी कार्यरत असताना महासारथी पोर्टल सुरू करण्यात आल्याने हजारो महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. परिणामी १ जुलैपासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र चालकांना विविध प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात संघटनेने अनेकदा शासनाकडे निवेदने सादर करून पाठपुरावा केला. तसेच विविध मागण्यांसाठी न्यायालयीन लढाही उभारण्यात आला. तरी देखील शासन स्तरावर अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महासारथी पोर्टलमुळे राज्यातील हजारो महा-ई-सेवा केंद्र चालक बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, लाखो सुशक्षित युवकांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन उभे केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होणार असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
याच पृष्ठभूमीवर राज्यातील महा-ई-सेवा व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १ जुलैपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वेळ पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन तिवसा येथील नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर यांच्यामार्फत प्रशासनाला देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सचिव विनोद तायडे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय वानरे, अमरावती जिल्हाध्यक्ष मनीष चौधरी, जिल्हा सचिव सुदर्शन यावले, राज्य कोषाध्यक्ष नीलेश इंगळे तसेच तिवसा परिसरातील व्हीएलई रोशन ठाकरे, सुभाष घोडे, सुरेंद्र शिरभाते, नरेंद्र खाकसे आणि सागर उताणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व केंद्र चालक उपस्थित होते.