अमरावती,
online-gaming : अमरावती जिल्ह्यातील मजुरांच्या असाह्यतेचा फायदा घेत त्यांना सरकारी योजनेचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांचा ऑनलाईन गेमींगसाठी वापर करणार्या सायबर टोळीचा भंडाफोड अमरावती ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी केला. या प्रकरणी १२ जणांना गोव्यातून अटक करण्यात आली असून १० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बँक खात्यामधून आतापर्यंत ६.२५ कोटीची उलाढाल झाली आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी ही माहिती दिली.

मजुंरांचे पासबुक, ए.टी.एम. कार्ड, लिंक खात्याचे सिमकार्ड घेवून व त्याबदल्यात त्यांना किरकोळ मोबदला देत त्यांचे बँक खाते सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरण्यात आल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारावर शिरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. साबर पोलिसांनी तांत्रीक तपास करून आरोपींना अटक व पुरावे गोळा करण्यासाठी ३ पथक तयार केले. तपासात उपरोक्त मजुरांचे बँक खाते अनाधिकृत ऑनलाईन गेमींगसाठी देशांतर्गत व देशाबाहेर वापरण्यात आल्याचे आणि त्यातून कोट्यावधीचे आर्थीक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे दक्षिण गोवा येथील उच्चभ्रू प्रोव्हीडंट अडोरा सोसायटीत सपोनि. विलासकुमार सानप व पोलिस अंमलदार प्रवीण वानखडे, प्रवीण अंबाडकर यांनी छापा टाकला.
त्यांनी देवचंद बंडूजी मेश्राम (वय २६ वर्ष, रा. अमरावती), प्रेम दिलीप खिलारे (वय २१ वर्ष, रार्थ नगरसिध्दा,हिंगोली), अनिकेत सुरेश मस्के (वय २४ वर्ष रा. पथ्रोट, ता. अचलपूर, योगेश भिमरावजी ईरपाते (वय ३१ वर्ष, रा तिवसा), प्रितम ज्ञानेश्वर इंगळे (वय २२ वर्ष रा. मोर्शी), आशिषकुमार उमाशंकर चौरसिया (वय — २५ वर्ष, रा अमेठी उत्तरप्रदेश), सत्यमप्रसाद मौर्य (वय २२ वर्ष, रा. अमेठी, उत्तरप्रदेश), शुभम गयाप्रसाद झारीया (वय ३० वर्ष, रा. जबलपूर), वैभव कामराज सुर्यवंशी (वय २४ वर्ष रा. हौशंगाबाद, मध्यप्रदेश), आदित्य युवराज माळी (वय — २७ वर्ष, रा. जबलपूर), सुशील इंदल बर्मन (वय २८ वर्ष, रा जबलपूर) आणि एक महिला अशा १२ जणांना पोलिसांनी अटक केली. राकेशकुमार झामनानी रा. अमरावती व इतर २ असे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
त्यांच्याकडून पासबुक ६४, एटीएम कार्ड १४७, चेकबुक १९, सिमकार्ड १९८, मोबाईल हँडसेट ५२, लॅपटॉप ९, टॅबलेट ३, असा एकूण १० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने आता पर्यंतच्या तपासामध्ये एकूण ६ कोटी २५ लाखाचे आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. तपासामध्ये एकूण ६४ बँक खाते मिळून आले असून सर्व खाते फ्रिज करण्यात आले आहे. या खात्यांच्या अनुषंगाने तपास केला असता त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ऑनलाईन तक्रारी दाखल आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षक अशोक लांडे, अमोल पुरी, संतोष गुर्जर, सुनील बनसोड, पंकज गोलीईतकर, रितेश गोस्वामी, अजित राठोड, संदीप जुगनाके, पवन ढोके, अंकीत अढाऊ, मयूर नरोकार, आशिष मुडें, सुमीत चव्हाण, रोशन आठवले, सरीता चौधरी, रुपाली इंगोले, पुनम कान्होलीकर, कल्पना सोनोत्रे, आचल मेटे, योगीता शेळके यांनी सहभाग घेतला होता.
सर्वसामान्य जनतेला आवाहन:-
लोकांनी किरकोळ मोबदल्यासाठी गुन्हेगारांच्या प्रलोभनाला बळी न पडता आपले नावावरील बँक खाते, एटीएम कार्ड, आधारकार्ड, मोबाईल नंबर स्वता:चे नावावर घेवून देऊ नये. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींनी ओटीपी मागीतल्यास देऊ नये. या बँक खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमींग, शेअर मार्केट ट्रेडींग, डिजीटल अरेस्ट अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये वापर होवून रक्कम ट्रान्सफर होते. या गुन्ह्यांपासून स्वत:ला सावध ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.