दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विलास गजघाटे

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
vilas-gajghate : दीक्षाभूमी स्मारक समितीतील अंतर्गत वाद आता उफाळून आला असून, समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया बहुमताने पूर्ण करण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे आणि प्रदीप आगलावे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
 
 
 
deekshabhumi
 
 
 
सोमवारी (२२ जून) सायंकाळी दीक्षाभूमी येथे झालेल्या बैठकीत ११ पैकी आठ विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीत विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. उपायुक्त धर्मादाय, नागपूर यांनी २० फेब्रुवारी २०२६ (ऑर्डर क्र. ५) तसेच १२ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले. या बैठकीला डॉ. कमल गवई, डॉ. राजेंद्र गवई, एन. आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. डी. बी. दाभाडे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि भंते नागदीपंकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते तर भंते सुरेई ससाई, सुधीर फुलझेले आणि ॲड. आनंद फुलझेले हे गैरहजर होते.
 
 
 
बैठकीत संस्थेच्या प्रशासकीय, कायदेशीर आणि वैधानिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धर्मादाय प्राधिकरणाच्या आदेशांचे पालन करण्याबाबत एकमत व्यक्त करण्यात आले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत दीक्षाभूमीची प्रतिष्ठा आणि पावित्र्य अबाधित ठेवण्याची तसेच संस्थेचे प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने चालविण्याची बांधिलकी विश्वस्तांनी व्यक्त केली.
 
 
नाईलाजास्तव हा निर्णय - डॉ. गवई
 
 
भंते ससाई हे आजही सर्वांसाठी आदरणीय आहेत. त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. मात्र, एककल्ली कारभार, अनियमितता आणि सामूहिक निर्णयप्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात आला, असे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. पुढील २४ तासांत भंते ससाई यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त करून समितीच्या इतर सदस्यांसोबत आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय सामूहिकरीत्या घेण्याची तयारी दर्शविल्यास, विलास गजघाटे यांची सचिवपदी नियुक्ती करून या निर्णयाचा फेरविचार करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
ही बैठकच असंवैधानिक : भंते ससाई
 
 
दरम्यान, भंते सुरेई ससाई यांनी ही बैठकच असंवैधानिक असल्याचा दावा केला आहे. डॉ. राजेंद्र गवई यांची सचिवपदावरील नियुक्तीही त्यांनी अमान्य केली आहे. तसेच, अन्य तीन सदस्यांच्या नियुक्तीची ‘चेंज रिपोर्ट’मध्ये अद्याप नोंद नसल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात रविवारी पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, न्यायालयानेच आपल्या सचिवपदाला मान्यता दिल्याचा दावा डॉ. गवई यांनी केला.
 
 
महाविद्यालयातील नियुक्त्यांची चौकशी होणार
 
 
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात भंते ससाई यांच्या कार्यकाळात झालेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच, भंते ससाई यांचे सहकारी रवी मेंढे आणि इतरांकडून महाविद्यालय तसेच स्मारक समितीच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.