NAFED's Sorghum Procurement नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नाफेड व शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेमार्फत सुरू असलेल्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप होत असून, काही व्यापारी शेतकर्यांच्या नावाचा वापर करून ज्वारी विक्री करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेना (शिंदे गट) तालुका पदाधिकार्यांनी प्रभारी तहसीलदार एस. व्ही. देशपांडे यांना निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात अनेक ठिकाणी ज्वारीचे पीक नसतानाही बनावट सातबारा उतारे व पीक नोंदीच्या आधारे नाफेडमध्ये नोंदणी करण्यात आल्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात केवळ ५८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली होती. या क्षेत्रातून अंदाजे ३ हजार क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना नाफेडमार्फत ९७ शेतकर्यांकडून तब्बल ७,०५८ क्विंटल ज्वारीची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ज्वारीची मोजणी करून शासकीय योजनेचा लाभ घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, फक्त ५८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी लागवड झाली असताना नाफेडमध्ये तब्बल ४७५ शेतकर्यांची नोंदणी कशी झाली, प्रत्यक्षात क्षेत्रात ज्वारी नसताना खरेदी केंद्रांवर आलेली ज्वारी कुठून आली, बनावट सातबारा व पीक नोंदी कोणी तयार केल्या, यामध्ये व्यापारी, दलाल की बनावट शेतकरी सहभागी आहेत, संबंधित अधिकार्यांनी वेळेत कारवाई का केली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संशयित लाभार्थ्यांची सखोल चौकशी करूनच त्यांना अनुदान अथवा खरेदीची रक्कम अदा करावी, अशी मागणी शिवसेना व शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.
यावेळी सुनील केने, प्रशांत वैघ, राजेंद्र लेंडे, पवन ठाकरे, दिलीप डोईफोडे, नंदकिशोर इंगळे, सुनील बनसोड, विवेक भगत, मंगेश मानके, अमोल सावदे, एकांत शिरभाते, नितीन रावेकर, मनोज जैन व ऋतिक गुल्हाने उपस्थित होते. याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी विकास पाटील म्हणाले की, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात रब्बी हंगामात १० हेक्टर तर उन्हाळी हंगामात ५७ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाल्याची नोंद आहे. या पिकाची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर ३० क्विंटल राहण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे.