शहरात चोवीस तासांत रस्ते अपघातात दोन ठार

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
- पारडी आणि गणेशपेठमध्ये गुन्हे दाखल

अनिल कांबळे
नागपूर, 
Road accidents शहरात रस्ते अपघाताच्या घटना रोजच घडत असून गेल्या चोवीस तासांत दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघात दोन जण ठार झाले. या प्रकरणी नंदनवन आणि गणेशपेठ पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत, गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोक्षधाम चौकाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. गुरूवारी सकाळी ६.२५ वाजताच्या पूर्वी इमामवाडा बस आगारासमोरील एसटी क्वॉर्टर्सच्या वॉल कंपाऊंडलगत हा अपघात घडला.
 
 
acci dksl
 
अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि धोकादायकरित्या चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या व्यक्तीला धडक दिली. या धडकेमुळे गंभीर दुखापत झाल्याने त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस मृतकाची ओळख पटवण्याचा आणि फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
दुसऱ्या घटनेत, नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापती चौकातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी भरधाव वेगाने जात असलेल्या कचरागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कचरागाडी चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. प्रणय दिलीप बडगे (२४, करुणानगर, शांतीनगर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
 
 
प्रणय हा २४ जून रोजी रात्री आपल्या घराजवळ राहणारा मित्र आर्य धर्मेश राठोड याच्यासोबत दुचाकीने (एमएच ४९ सीटी २७७३) कुही फाटा येथे एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथून परत येत असताना, गुरूवारी (ता. २५ जून) सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास प्रजापती चौकातील उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात घडला. उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या कचरागाडीच्या (एमएच ३१ एफसी ४३०३) चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून प्रणयच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रणयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रणय याचे वडील दिलीप ताराचंद बडगे (५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी फरार कचरागाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.