- विकृत शिक्षकाला अटक
अनिल कांबळे
नागपूर,
Sexual assault शहरात लैंगिक अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. प्रतापनगरमध्ये गिटार शिकविणाऱ्या शिक्षकाने १० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात एका ७७ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.प्रतापनगर येथील घटनेत अनित्य मनोहर (वय ३०) हा गिटार शिक्षक आरोपी आहे. पीडित मुलीची आई उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या माहेरी प्रतापनगर येथे मुलगी आणि १३ वर्षीय भाचीसह राहत होती.
तिने दोन्ही मुलींना गिटार शिकण्यासाठी आरोपी शिक्षकाकडे पाठविले होते. २५ जून रोजी दुपारी गिटार क्लासदरम्यान आरोपीने १० वर्षीय विद्यार्थिनीला वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीच्या वर्तनात झालेला बदल पाहून आईने विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून पॉक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
७७ वर्षीय महिलेवर बलात्कार,
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. तक्रारीनुसार, आरोपी हा पीडित महिलेच्या परिसरातच राहणारा असून तिच्या परिचयातील आहे. यापूर्वी तो घरकामात मदत करण्यासाठी तसेच आवश्यक सामान पोहोचविण्यासाठी तिच्या घरी येत असे. घटनेच्या दिवशी आरोपी महिलेच्या घरी गेला आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्यावर मारहाण केली, जबरदस्तीने तिला रोखून धरले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.