नुकसानग्रस्त भागाची आ. संजय गायकवाड यांनी अधिकार्‍यांसमवेत केली पाहणी

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
 
बुलढाणा, 
MLA Sanjay Gaikwad गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली पिके आडवी झाल्याने तसेच शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आ. संजय यांनी दि. २७ जून रोजी मोताळा तालुयातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. मोताळा तालुयातील तपोवन, काळेगाव, सारोळा पीर तसेच सारोळा मारुती या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन आ. संजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
 
 
sanjay
 
यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि नुकसानीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडली आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या घरांचे, गोठ्यांचे तसेच शेतीपूरक साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती यावेळी समोर आली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आ. गायकवाड यांच्याकडे केली.
 
 
यावेळी आ.संजय गायकवाड यांनी उपस्थित महसूल व पंचायत राज विभागातील अधिकार्‍यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे अचूक व पारदर्शक पंचनामे करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौर्‍यादरम्यान तहसीलदार सारिका पाटील, गटविकास अधिकारी सुरोशे, मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.