शांती समाधान संस्थेतर्फे ६० ठिकाणी योग दिन उत्साहात

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Yoga Day सुख शांती समाधान संस्था नागपूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर व परिसरातील संस्थेच्या नियमित सुरू असलेल्या ६० योग केंद्रांवर उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक केंद्रावर संस्थेच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनातील त्याची भूमिका नियमित योगाभ्यासाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावर्षी संस्थेची ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची समृद्ध वृद्धत्व ही थीम यांचा समन्वय साधत सहभागी नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम तसेच ओंकार साधना करण्यात आली.
 
 
yoga day
 
अध्यक्ष सचिन माथूरकर यांचे मार्गदर्शनपर ध्वनिमुद्रित संदेश सर्व केंद्रांवर उपस्थितांना ऐकविण्यात आला. याशिवाय डब्ल्यूसीएल उमरेड, एम. बी. टाऊन, नर्सिंग कॉलेज, वाठोडा गर्ल्स हॉस्टेल, छावणी, कोराडी क्रीडा संकुल, भीलगाव ग्रामपंचायत, भागुबाई समाज, कामठी, डब्ल्यूसीएल नागपूर तसेच आशा संस्थेसह विविध ठिकाणी योग दिनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः डब्ल्यूसीएल नागपूर येथे तब्बल १२०० योगप्रेमींनी सामूहिक योगासने, प्राणायाम, ओंकार साधना करून नियमित योग करण्याचा संकल्प केला. संस्थेची रायपूर शाखेनेही विविध ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले. सुख शांती समाधान संस्था गेल्या २२ वर्षांपासून निःशुल्क व निःस्वार्थ सेवाभावाने योग प्रसाराचे कार्य करीत असून संस्थापक अध्यक्ष व योगगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यसंघ सातत्याने समाजहिताचे उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचे नियोजन प्रकल्प संचालक सुनील पोतदार यांनी प्रभावीपणे केले.