Farmers' Hunger Strike करणवाडी, घोडदरा, खडकी आणि नरसाळा या गावांना जोडणारा शिवधुरा (पांदण) रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा, चार वेळा करण्यात आलेली उपोषणे, वारंवार दिलेली निवेदने आणि महसूल प्रशासनाकडून झालेल्या आदेशानंतरही प्रत्यक्षात रस्ता मोकळा न झाल्याने संतप्त शेतकरी आता अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून न्यायाची मागणी करीत आहेत.
उपोषणकर्ते संदीप उमरे यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौदावा दिवस झाला असून 24 जूनपासून रूपाली राहुल रोगे आणि शालू गजानन जिवतोडे या दोन महिला शेतकरीदेखील अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
आदेश झाले, मग अंमलबजावणी का नाही..?
संबंधित रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याबाबत महसूल प्रशासन स्तरावर प्रक्रिया पूर्ण झाली असून आदेशदेखील पारित करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी नेमकी कोणत्या कारणामुळे रखडली आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. सरकारने सार्वजनिक रस्ते, पांदण रस्ते आणि वहिवाट मार्ग अतिक्रमणमुक्त ठेवण्याबाबत स्पष्ट धोरण स्वीकारले असताना, या प्रकरणात मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आमची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर शेती करायची कशी आणि शेतीच करता आली नाही तर जगायचे कसे, असा थेट प्रश्न आंदोलनात सहभागी महिला शेतकèयांनी उपस्थित केला आहे.