आ. राजेश वानखडे यांची विधानसभेत आग्रही मागणी
तिवसा,
'gurukunj upasa sinchan yojana' तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातून वंचित राहिलेल्या १२ गावातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी गुरुकुंज वाढीव उपसा सिंचन योजनेला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आमदार राजेश वानखडे यांनी केली.
पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी विधानसभेत ही मागणी केली. सिंचनापासून अनेक वर्षे वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. तिवसा तालुक्यातील वऱ्हा सर्कलमधील वऱ्हा, जावरा, मालधुर, सालोरा, धोत्रा, माळेगाव, शेंदोळा, शिरजगावसह परिसरातील एकूण १२ गावे आजही सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. या गावांना अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कालव्यावर आधारित वाढीव उपसा सिंचन योजना अथवा स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार वानखडे सातत्याने शासनाकडे करत आहेत.
यापूर्वी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जलसंपदा मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानुसार या १२ गावांचा अप्पर वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासाठी सर्वेक्षण प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार प्रादेशिक जलसंपदा कार्यालयामार्फत सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र, शासनाकडून ही गावे वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे कळविण्यात आले. यावर आक्षेप घेत आमदार वानखडे यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, वैनगंगा–नळगंगा नदीजोड हा अत्यंत मोठा प्रकल्प असून तो टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. त्यामुळे संबंधित १२ गावांचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात समावेश होण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष सिंचनासाठी किमान १५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत येथील शेतकरी पाण्याविना शेती करण्यास बाध्य राहतील. आ. वानखडे यांनी सांगितले की, अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या ९.३९ दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होत आहे. या उपलब्ध पाण्याच्या आधारे वाढीव गुरुकुंज उपसा सिंचन योजना राबविल्यास वंचित १२ गावांतील शेतकऱ्यांना अल्पावधीत सिंचनाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे या गावांचा अप्पर वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करून सर्वेक्षण पूर्ण करत वाढीव उपसा सिंचन योजनेस तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.