- ६ दुचाकींसह कारचेही नुकसान
अनिल कांबळे
नागपूर,
Incident in the Gitanjali Chowk शहरात सोमवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसादरम्यान गीतांजली चौक परिसरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली. येथील जुन्या आणि जीर्ण इमारतीच्या वरची पॅराफिट भिंत अचानक कोसळल्याने तिच्या ढिगाऱ्याखाली दबून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार आणि सुमारे सहा दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतोष छोटेलाल गौर (वय ५२, रा. फुटाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गीतांजली टॉकीजजवळील नारायण चेंबर या इमारतीत बॉम्बे स्कूटर्स, गौरव एसेसरीज तसेच अन्य दुकाने आहेत. सोमवारी संतोष गौर हे आपली दुचाकी दुरुस्तीसाठी बॉम्बे स्कूटर्स या दुकानात आले होते. याचदरम्यान इमारतीची जीर्ण झालेली पॅराफिट भिंत अचानक कोसळली आणि मोठा मलबा थेट संतोष यांच्या अंगावर पडला. ते ढिगाऱ्याखाली अडकले. परिसरातील नागरिकांनी तातडीने मलबा हटवून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत रस्त्यालगत उभी असलेली एमएच-४९ बीडब्ल्यू-६१२१ क्रमांकाची कार पूर्णतः क्षतिग्रस्त झाली. तसेच जवळ उभ्या असलेल्या सहा दुचाकीही मलब्याखाली येऊन नुकसानग्रस्त झाल्या. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत अनेक दिवसांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. दरम्यान, पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून इमारतीची स्थिती, वेळोवेळी संरचनात्मक तपासणी झाली होती का, तसेच आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या की नाही, याची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.