कर्ज भरणाऱ्या ९३ हजार शेतकऱ्यांना लाभ
अमरावती,
shetkari karjmukt शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील १२ प्रमुख बँकांमधील २ लाख २ हजार थकित कर्जदार आणि ९३ हजार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली असून, या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील १२ प्रमुख बँकांतर्गत एकूण २ लाख २ हजार १६७ शेतकऱ्यांची खाती या योजनेत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहेत. यातील रक्कम सुमारे २३३८ कोटी रुपये होणार आहे. तसेच वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या ९३ हजार १३९ शेतकरी खात्यांना ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्यासाठी ५२४ कोटी रुपये कळविण्यात आले आहे. बँकनिहाय आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सर्वाधिक ७१ हजार ६५५ खात्यांची ७०० कोटी रुपयांची रक्कम कळविण्यात आली आहे. त्या खालोखाल स्टेट बँक ऑफ इंडियातील ४१ हजार १३५ खात्यांच्या ५१३ कोटी रुपयांची रक्कम आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या २९ हजार ९८० खात्यांना ४८८ कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम कळविण्यात आली आहे. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे २९ हजार १० शेतकऱ्यांचे २९८ कोटी, बँक ऑफ बडोदाचे ३ हजार १०२ शेतकऱ्यांचे ४७ कोटी, बँक ऑफ इंडियाचे ७ हजार १८३ शेतकऱ्यांचे ८० कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाचे ६ हजार १७० शेतकऱ्यांचे ७६ कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे २ हजार ८३ शेतकऱ्यांचे २९ कोटी, युको बँकेचे ५१८ शेतकऱ्यांचे ५ कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे २ हजार १८२ शेतकऱ्यांचे ८ कोटी, कॅनरा बँकेचे १ हजार ९०२ शेतकऱ्यांचे ९ कोटी आणि इंडियन बँकेच्या ७ हजार २४७ शेतकऱ्यांच्या ८२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे कळविण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बँकांना हा गोळा केलेला डेटा पोर्टलवर तातडीने अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ही रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल.