कापसातील तणनियंत्रणासाठी तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी तंत्रज्ञानाला मान्यता द्या

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे शेतकरी संघटनेची मागणी

यवतमाळ, 
Approve HTBT technology कापसाच्या उत्पादकता वाढीसाठी कापसातील तणनियंत्रण हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यासाठी तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी तंत्रज्ञानाला त्वरित मान्यता द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांना शेतकरी संघटनेने पाठविले आहे. या निवेदनात 11 जुलै 2025 रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या, कापसाच्या उत्पादकतेत वाढ करण्याबाबत देशातील विविध राज्यांचे कृषीमंत्री, शेतकरी, बियाणे उत्पादक, कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे स्मरण करून देण्यात आले आहे.
 
 
kapus
 
या परिषदेत उपस्थित सर्वच कृषी संबंधित मान्यवर आणि शेतकèयांनी कापूस उत्पादनात ‘तण नियंत्रण’ ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले होते. त्या परिषदेत त्या सर्वांंनी तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी तंत्रज्ञानाला त्वरित मान्यता देण्याची मागणी केली होती, याकडे कृषीमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्या परिषदेत नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी विविध देशांत कापूस उत्पादनासाठी बियाणे तंत्रज्ञान आणि कापूस रुई उत्पादकतेची सांगड घातली होती. त्यात भारताची हेक्टरी उत्पादकता 440 किलो, चीन 1950 किलो, ऑस्ट्रेलिया 2140 किलो, ब्राझील 1939 किलो आणि अमेरिका 1008 किलो असल्याची माहिती देण्यात आली होती.
 
 
त्यावेळी डॉ. वाघमारे यांनी 2006 नंतर कोणतेही नवीन तंत्रज्ञान भारतात आले नाही, तणनाशक सहिष्णुता आणि गुलाबी बोंडअळीस प्रतिकारक्षमता असलेले अनेक वाण मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याकडे आपले लक्ष वेधले होते, हेही शेतकरी संघटनेने या निवेदनातून केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. केंद्र सरकारच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग यांनी जमीन वापर आणि बियाण्यांबाबत सांख्यिकी माहितीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कापूस उत्पादनासाठी ‘बियाणे तंत्रज्ञान’ हा प्रमुख घटक असल्याचे निदर्शनास येते, असेही शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीप्रमुख मिलिंद दामले यांनी या निवेदनात म्हटले आहे.
 
 
तसेच देेशी बियाणे : कापूस रुई उत्पादकता हेक्टरी 88 ते 125 किलो, संकरित बियाणे : रुई उत्पादकता 152 ते 225 किलो, बॉलगार्ड 1 बीटी बियाणे रुई उत्पादकता : 191 ते 362 किलो आणि बॉलगार्ड 2 बीटी बियाणे रुई उत्पादकता 378 ते 512 किलो असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले असून तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी तंत्रज्ञानाला त्वरित मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.