फुटाळा येथील असद खान हत्याकांड उघड

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
- तीन आरोपी अटकेत, सात दिवसांची पोलिस कोठडी
अनिल कांबळे

नागपूर, 
Phutala murder case फुटाळा तलाव परिसरात रविवारी घडलेल्या असद खान हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जितेंद्र ऊर्फ जंगली शिवाकांत पांडे (२५), त्याचा भाऊ योगेंद्र ऊर्फ लाला शिवाकांत पांडे (२०) आणि दीपक ऊर्फ प्रिन्स मनोज गुप्ता (१९, सर्व रा. पांढराबोडी-अंबाझरी) यांचा समावेश आहे. तिघांना पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
 
 
atak
सोमवारी सायंकाळी फुटाळा तलाव परिसरात एका ठेल्याजवळ सलमान इशाक शेख (३५), मयूर भोजराज जाधव (३४), शशांक तायवाडे (३२) आणि असद खान शहनवाज खान (२८) हे मित्र उभे होते. त्यावेळी योगेंद्र ऊर्फ लाला पांडे तेथे आला. तो सलमान आणि त्याच्या मित्रांकडे रागाने पाहत असल्याने मयूर जाधवने त्याला "काय बघतोस?" अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर योगेंद्रने त्याचा भाऊ जितेंद्र, दीपक तसेच चार अल्पवयीन साथीदारांना घटनास्थळी बोलावले. योगेंद्रने असद खान आणि मयूर जाधव यांच्यावर चाकूने वार केले. तर इतर आरोपींनी सलमान आणि शशांक यांना मारहाण केली. यात असद खान ठार झाला तर मयूर जाधव याच्यावर उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीतून आरोपी जेरबंद
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे काही तासांत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी जुन्या वादातून आणि आपसी रागातून हा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.