पावसाळ्यातही चांदूर रेल्वेत पाणीटंचाई

-काही भागांत टँकरने पाणीपुरवठा -दोन्ही पाणीपुरवठा मोटारी बंद

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
चांदूर रेल्वे, 
water-scarcity-in-chandur-railway : एकीकडे पावसाळ्याने जोर धरला असताना, दुसरीकडे चांदूर रेल्वे शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील काही परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
 
 

j 
 
 
 
शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील दोन्ही मोटारी बंद पडल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होण्यापूर्वी काही भागांमध्ये गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून, नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषदेकडून ज्या भागांत मागील काही दिवसांपासून पाणी पोहोचलेले नाही, त्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
 
 
याबाबत बोलताना नगरसेविका प्रियांका वरठे म्हणाल्या, चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. माझ्या प्रभागातही अनियमित पाणीपुरवठा झालेला आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. नळातून गढूळ पाणीपुरवठा होत असून, यावरून नगरपरिषदेचा हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सुरळीत व शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करायला हवा.