व्हिडिओ तयार करण्यावरून वाद
तीन मारेकर्यांना अटक
अमरावती,
Murder in Amravati बहिणीच्या मैत्रीणीचा व्हीडीओ का बनवला, असा जाब विचारताच भरचौकात चाकू भोसकून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकर्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे. प्रज्वल सुनील खरे (२६) असे मृतक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी मनोज राजु पाचेकर (२३, रा. जय सियाराम नगर), सचिन छदामीलाल गुजर (२२, मांडवा झोपडपट्टी) आणि मुख्य मारेकरी मारी ऊर्फ आदित्य प्रमोद भडके (२६) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात प्रज्वलची चुलत तथा मावस बहिण दिव्या हीने पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनूसार, २ जूनला रात्री तिच्या मैत्रिणीने तिला माहिती दिली कि, तिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ ‘एआय’ द्वारे तयार करण्यात आला असून तो सोशल मिडीयावर टाकण्यात आला आहे.
Murder in Amravati ३ जूनला दिव्याने ज्या मुलाने व्हिडिओ तयार केला होता, त्याला जाब विचारला की, ‘तू माझ्या मैत्रिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ का बनवला आणि तो सोशल मिडीयावर का पाठवला’ यावेळी तो मुलगा उध्दटपणे बोलू लागला. त्याने आणि त्याच्या मित्रांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दिव्याने तिचा चुलत भाऊ प्रज्वल खरे याला फोन करून तिथे बोलावले. प्रज्वल हा त्याचा मित्र अक्षय पावडे याच्यासह मोटारसायकलने तातडीने घटनास्थळी पोहोचला. प्रज्वलने त्या मुलाला आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि बहिणीच्या मैत्रिणीचा असा व्हिडिओ काढून व्हायरल का केला, अशी विचारणा केली. तेवढ्यात तिथे मनोज पाचेकर आणि सचिन गुजर हे देखील आले. त्यांनी मध्यस्थी न करता उलट प्रज्वललाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाचही जणांनी प्रज्वलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद आणि मारहाण सुरू असतानाच अचानक तिथे ’मारी उर्फ आदित्य भडके’ व त्याच्यासोबत अन्य एकजण आला. मारीने काहीही न विचारता थेट खिशातील चाकू काढला आणि इतर मुलांनी पकडून ठेवलेल्या प्रज्वलच्या पोटात वार केला आणि सर्वच मारेकरी पळून गेले. प्रज्वलला त्याची बहीण दिव्या व इतरांनी तात्काळ पीडीएमसीमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रज्वलची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरुन सहा जणांविरुध्द गुन्हा दाखलू करुन तिघांना ताब्यात घेतले आहे.