पक्षांतर्गत गटबाजीने होते त्रस्त
शिंदे गटात जाण्याची शक्यता
अचलपूर,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अचलूपर-मेळघाट विधानसभा क्षेत्राचे अमरावती जिल्हाप्रमुख Narendra Padole नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नरेंद्र पडोळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, १९८५ पासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले असून शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशा विविध जबाबदार्या त्यांनी सांभाळल्या आहेत. संघटना वाढीसाठी सातत्याने कार्य करताना अनेक आंदोलने उभारली, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आणि पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, अमरावती जिल्ह्यातील काही वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्ह्याची जबाबदारी नसलेल्या काही नेत्यांकडून त्यांच्या कामात अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांनी बोलावलेल्या बैठकींना पदाधिकारी व शाखाप्रमुखांनी उपस्थित राहू नये यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे.
Narendra Padole पडोळे यांनी असेही म्हटले आहे की, जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी त्यांचे तिकीट अनेकदा कापण्यात आले. त्यांच्या जागी देण्यात आलेल्या उमेदवारांना जनतेने नाकारले, तरीही पक्षात कार्यकर्त्यांऐवजी काही विशिष्ट गटांना प्राधान्य दिले जात असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली आहे. पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार, असेही नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या राजीनाम्यामुळे अचलपूर-मेळघाट परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आ. बच्चू कडू यांनी त्यांना शिंदे गटात येण्याचे निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले असून अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.