वेध
सोनाली पवन ठेंगडी
आता पुढील काळ एआयचा artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) आहे, असे आपण काही वर्षांपूर्वी जाणत्या लोकांकडून ऐकले होते. पण, एआय किती प्रभाव टाकू शकतो, याची कल्पना कोणालाच नव्हती. आता कदाचित तज्ज्ञांना याची पुरेपूर कल्पना येते आहे. एआय आता हातातील मोबाईलपासून मोठमोठ्या तंत्रज्ञानापर्यंत व्यापून उरलाय. काहींचे म्हणणे आहे की, हे सारे चांगलेच आहे. एआयने जगाची कामे सुरळीत केली आहेत. पण, यातील एक मोठा धोका जो पुढील काळाच्या दृष्टीने घातक आहे, त्याविषयी चिंता करण्याची गरज आहे. तो मुद्दा म्हणजे, नवीन पिढी एआयच्या अक्षरश: अधीन झाली आहे. नव्या पिढीने एआयच्या अधीन होणे ही सामाजिकच नव्हे तर एकूणच जागतिक परिवेशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. कारण एआयमुळे मुले स्वत:च्या डोक्याने विचार करणे विसरत आहेत. एआयच्या मदतीने ते आपल्या सर्व समस्यांची उत्तरे शोधतात. ही सवय त्यांच्या अभ्यासापर्यंत असती तर ठीक होते. पण, दैेनंदिन जीवनातील भावनिक समस्यांच्या बाबतीतही ते एआयची मदत घेताना दिसताहेत.
artificial intelligence एका प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांना एक असाईनमेंट दिली. दुसऱ्या दिवशी चर्चेदरम्यान त्यांनी पाहिले की, जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे तर्क, उदाहरणे आणि वाक्ये सारखीच होती. हे स्पष्ट होते की, बहुतेकांनी एआयचा वापर केला होता. प्राध्यापकांची चिंता केवळ एआयच्या वापराची नव्हती. त्यांना चिंता होती की, जेव्हा माणूस आपले विचार आणि निर्णय यंत्रांवर सोपवतो, तेव्हा त्याची स्वतःची उपयुक्तताही कमी होऊ लागते. मुलांच्या बाबतीत तर हे आणखी चिंताजनक आहे. जर एखादे मूल सुरुवातीपासूनच एआयवर अवलंबून राहिले, तर त्याच्यामध्ये स्वतंत्र विचारशक्ती विकसितच होऊ शकणार नाही. अशी मुले प्रश्न विचारण्याची, तर्क करण्याची आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजून घेण्याची क्षमता कदाचित मिळवूच शकणार नाहीत. अशा स्थितीत मग ते आयुष्यातील संकटांचा सामना करणार तरी कसा? सगळीकडे एआय धावून येणार नाही. एक वेळ अशी येते जेव्हा माणसाला आपल्या समस्यांची सोडवणूक आपल्या तर्कबुद्धीने आणि व्यवहार्य वागणुकीने करावी लागते. जपानमध्ये भात आणि माशांपासून बनवल्या जाणाèया सुशी नावाच्या पदार्थाला तयार करणारे शेफ पहिले दोन वर्षे फक्त भात शिजवायला शिकतात. या काळात त्यांना माशाला स्पर्श करण्याचीही परवानगी नसते. याचा उद्देश सुशी बनवण्याच्या कलेसोबतच संयम, शिस्त, एकाग्रता आणि बारकाईने काम करण्याची सवय विकसित करणे हा आहे. मानवी भावनांचा विचार करून या सवयी विकसित करण्यामागे त्यांच्या गुणांचा विकास करणे, हा उद्देश असतो. मानवी विचारशक्ती सर्वोपरी असते, ही यामागील मूळ भावना आहे. मानवामध्ये असलेली अफाट शक्ती हे या जगातील सर्वात मोठे वास्तव आहे. शेवटी ज्या एआयवर आज मानव अवलंबून आहे त्याचा आविष्कार आपोआप झालेला नाही. तो देखील मानवानेच केलेला आहे. मानवाच्या गुणांना अनुभवाची जोड असते. एक कवी जेव्हा कवितेची रचना करतो तेव्हा त्याच्यासाठी तो आत्मानुभव घेत असतो. याउलट, एआयच्या रचना वरवर सुंदर दिसू शकतात, पण त्यांच्यात मानवी अनुभवांतून येणारा तो आत्मा नसतो. एआय आधीपासून अस्तित्वात असलेले पॅटर्न आणि डेटा शिकून काम करते, तर मानवी सर्जनशीलता अनेकदा तेच पॅटर्न मोडून काहीतरी अनोखे आणि नवीन निर्माण करते मुळात, एआयचा वापर करणे चुकीचे नाही, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने बौद्धिक विकास थांबू शकतो. म्हणून काही बाबतीत एआयच्या वापरात थोडे बदल करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पेन हातात धरणे सोडायला नको. जेव्हा संगणक आला, तेव्हा अनेक लोकांनी पेनने कागदावर लिहिणे सोडून दिले होते. आता एआयच्या मदतीने बोलून टाईप करता येतं, ज्यामुळे टाईप करण्याची सवयही कमी होत आहे. जेव्हा आपण लिहितो, तेव्हा केवळ वाक्ये बनवत नाही, तर आपले मन व्यवस्थित करायला शिकतो. आपण एखाद्या विषयावर सखोल विचार करतो, तो समजून घेतो आणि मग आपले विचार योग्य शब्दांत मांडतो. आज नव्या पिढीला पुन्हा लिखाण, वाचन याकडे नेणे फार अवघड दिसत असले, तरी अशक्य नक्कीच नाही. पण, अर्थात यासाठी पालक आणि शिक्षकांनाही स्वत:मध्ये तसा सकारात्मक बदल घडवावा लागेल. ‘आम्ही ‘बि’घडलो, तुमी ‘बि’घडाना’ हे वाक्य पालक आणि शिक्षक कसे वापरतात, यावर पुढील पिढीचे भवितव्य अवलंबून राहील, हे नक्की.
94032 11673